औरंगाबाद : जावयाने सासऱ्याचा प्लॉट बनावट सह्या करून परस्पर तिसऱ्यालाच विक्री केल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली असताना बायजीपुरा भागातील मोतीवाला नगरमध्ये एका महिलेच्या नावाचे बनावट आधार कार्ड, पासपोर्ट फोटो तयार करून प्लॉटची खरेदी-विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला गोपाल अग्रवाल (रा. संजना पार्कमेन, बिचाेली मर्दाना) यांच्या मालकीचा २८० चौरस मीटरचा रिकामा प्लॉट बायजीपुऱ्यातील मोतीवालानगरमध्ये आहे. निर्मला अग्रवाल यांचे बनावट आधार कार्ड तयार करून सुभाष तान्हाजी साताळकर (वय ५१, रा. एन-४, सिडको) याने हा प्लॉट खरेदी केल्याचे एका दैनिकात आलेल्या जाहीर प्रगटनावरून निदर्शनास आले. त्या प्रगटनावर आक्षेप नोंदवत निर्मला अग्रवाल यांचा मुलगा नीलेश गोपाल अग्रवाल यांनी लिहून घेणार असलेल्या सुभाष साताळकर याची नोंदणीकृत इसार पावती जाहीर प्रगटन प्रसिद्ध करणाऱ्या वकिलांकडून मिळवली. त्यामध्ये लिहून देणार निर्मलाबाई गोपालदास अग्रवाल असे नाव असलेले आधार कार्ड व फोटो हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नीलेश अग्रवाल यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेत सुभाष साताळकर, एम.ए. काझी याच्यासह अनोळखी दोन महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ ठाकूर हे करीत आहेत.
आरोपींना तीन दिवसांची पोलीस काेठडीतपास अधिकारी गोपाळ ठाकूर यांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना तत्काळ अटक केली. त्यांच्याकडून प्लॉटच्या संदर्भात बनविण्यात आलेली बनावट कागदपत्रे हस्तगत केली आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपींनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे.