औरंगाबाद : कोविड संसर्गामुळे बंद असलेली सोने-चांदीची दुकाने फोडणारी परप्रांतीय टोळी राज्यात दाखल झाली आहे. ही टोळी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडते, गॅस कटरने तिजोरी कापून सर्व माल चोरून नेते, अशा टोळीपासून सावध करण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व सराफा दुकानदारांच्या बैठकांचे सत्र सुरू केले.
पोलिसांना चार दिवसांपूर्वी गोपनीय सूत्रांकडून याविषयी माहिती प्राप्त झाली. या माहितीची गंभीर दखल घेत शहरातील सर्व ठाणेदारांनी त्यांच्या हद्दीतील सोने-चांदीच्या दुकानमालकांची बैठक घेऊन त्यांना या टोळीविषयी सावध करावे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. सूत्राने सांगितले की, राज्यात कोविड संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू आहे. यामुळे शहरातील सराफा दुकानांना टाळे आहेत. या दुकानातील सोने-चांदीचे अलंकार चोरून नेणारी ही टोळी राज्यात दाखल झाली आहे. या टोळीत आठ ते दहा सदस्य असतात. टोळीतील प्रत्येक व्यक्तीवर स्वतंत्र जबाबदारी असते.
विशेष म्हणजे पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ही टोळी मध्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये मुक्काम करते. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचा अधिकारी असल्यासारखे ते वागतात. रेकी करून दुकानाच्या मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून आत घुसतात, दागिन्यांची तिजोरी गॅस कटरने कापून त्यातील सर्व ऐवज घेऊन टोळी पसार होते. अशी या टोळीची कार्यप्रणाली आहे. या टोळीतील एका संशयिताचे छायाचित्र पोलिसांना प्राप्त झाले. शहरात असा गुन्हा घडू नये याकरिता वरिष्ठांच्या आदेशाने प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील सराफांच्या बैठका घेऊन दुकानदारांना संशयिताचे छायाचित्र दाखविले जात आहे. शिवाय दुकानाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना पोलीस अधिकारी दुकानदारांना देत आहेत.