औरंगाबाद : शहरात डेंग्यू (Dengue) , मलेरिया, कावीळ, चिकुन गुन्याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संशयित डेंग्यू रुग्णांची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. अशा रुग्णांची संख्या दहापर्यंत पोहोचल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. साथ रोगांनी त्रस्त असलेल्या चार हजार रुग्णांची कोरोना तपासणी केली असता त्यामध्ये २१ जण बाधित आढळून आले. खासगी रुग्णालये कोरोना तपासणी ( Corona Test ) करण्यासाठी महापालिकेला अजिबात सहकार्य करीत नाहीत. ( Be careful! Ten dengue patients tested positive in ten days in Aurangabad)
पावसाळा सुरू होताच साथीचे आजार पसरू नयेत म्हणून महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत ॲबेटिंग, धूर फवारणी, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, जनजागृती करणे अशी कामे केली जात आहेत. असे असले तरी दोन-तीन आठवड्यापासून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. शहराच्या अनेक भागात डेंग्यू, मलेरिया, कावीळ, चिकुन गुन्याचे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या फीवर क्लिनिकमध्ये १३ जुलैपासून आत्तापर्यंत चार हजार ९९४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात तापाचे रुग्ण असल्याने त्यांची आरटीपीसीआर व ॲंटिजन चाचणीही करण्यात आली असता आरटीपीसीआरमधून १८, तर ॲंटिजन चाचणीतून तीनजण बाधित आढळून आले. त्याचप्रमाणे शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दहा दिवसात दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या वर्षभरात दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. दरम्यान, यंदा ९२ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
खासगी डॉक्टरांचे असहकार्यशहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण साथीच्या आजारावर उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी डॉक्टरांना पत्र पाठवून संशयित रुग्णांच्या तपासण्या करण्याची सूचना दिली. एकही खासगी डॉक्टर महापालिकेच्या सूचनेनुसार तपासणी करायला तयार नाही. कोरोना तपासणी केली तर रुग्ण येणारच नाहीत, अशी भीती खासगी डॉक्टरांना वाटत आहे. या शिवाय तपासण्यांचे रेकॉर्ड ठेवावे लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाकडून खासगी डॉक्टरांना आवाहन करण्यात येणार आहे.