औरंगाबाद : घरात भाडेकरू असलेल्या एका व्यक्तीने वृद्ध घरमालकाला बँकेच्या ऑनलाइन व्यवहारासाठी वारंवार मदत करीत पासवर्ड, ओटीपी मिळवले. यानंतर एचडीएफसी बँकेतून ऑनलाइन ४ लाख २५ हजार रुपये एवढे कर्ज काढले. यातील ३ लाख ८५ हजार रुपये स्वत:सह डिमॅट खात्यावर हस्तांतरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मनोज चंद्रकांत फडके (रा. अच्युतानंद अपार्टमेंट, एस. बी. रोड, दहीसर, मुंबई) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रमेश नानुलाल मिश्रा (६०, रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, आलोकनगर, सातारा परिसर) यांच्या घरात मनोज फडके हा किरायाने राहत होता. त्याने १ जून २०१९ ते २० जुलै २०२० या काळात रमेश यांना ऑनलाइनबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे रमेश हे ऑनलाइनद्वारे वस्तू मागविण्यासाठी फडकेची मदत घेत होते. मनोज मोबाइलवरून माहिती भरून द्यायचा. त्यासाठी पासवर्ड आणि ओटीपीचा उपयोग करायचा. मनोज फडके शेअर्सचा व्यवसाय करत असल्यामुळे त्याला बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे आणि शेअर्स विक्री करण्याचा अनुभव होता. त्याने रमेश यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे आमिष दाखवले. तो नेहमी शेअर मार्केटिंगवर माहिती देत होता.
शेअर मार्केटिंग शिकवीत रमेश यांना बँकेत डी मॅट खाते उघडण्यास सांगितले. त्याप्रमाणे रमेश यांनी बँकेत खाते उघडले. त्यांच्या खात्यावर सन २०१९ मधील जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत खात्यावर प्रायोगिक तत्त्वावर व्यवहार करण्यात आला. मात्र, शेअर मार्केटमधून रमेश यांना कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी या खात्यावरील व्यवहार बंद केला. याचदरम्यान फडकेने त्यांच्या नावे बँकेतून ४ लाख २५ हजारांचे ऑनलाइन कर्ज घेतले. त्यापैकी ३ लाख ८५ हजार रुपये हस्तांतरित केले. पुढील तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करत आहेत.
न्यायालयाच्या आदेशान गुन्हा दाखलरमेश मिश्रा यांनी फसवणूक झाल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.