- राम शिनगारे
औरंगाबाद : थोडा खोकला आला होता. त्यामुळे तपासणी केली, तर आम्हाला कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. माझ्या घरातील चार महिलांची तपासणी केल्यानंतर त्या सर्व पॉझिटिव्ह आल्या. आम्ही दहा दिवस जिल्हा रुग्णालयात होतो. त्याठिकाणी घरून येणारा डबा खात आराम करीत होतो. डॉक्टर सतत तपासण्या करीत होते. गोळ्या-औषधी देत होते. घरातल्यासारखे दवाखान्यात राहिलो. आता सुखरूप घरी परतलो आहोत, अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या कर्मचारी तथा जयभीमनगर घाटीच्या रहिवासी सुभद्राबाई प्रकाश जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
घाटी परिसरातील जयभीमनगर येथील तब्बल ६८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यातील सर्वच नागरिक कोरोनामुक्त होऊन घरी पोहोचले आहेत. या काळात आलेला अनुभव ५५ वर्षीय महापालिकेच्या कर्मचारी सुभद्राबाई जाधव यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, आमच्या घरातील माझी ७५ वर्षांची सासू, ३५ वर्षांची सून आणि १२ वर्षांची नात पॉझिटिव्ह आली होती. आमच्या घरातील एकाही पुरुषाला बाधा झाली नव्हती. आम्हाला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती, तरीही जिल्हा रुग्णलयात अॅडमिट केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या. आम्ही काही घाबरलो नाही. वेळेवर घरून जेवण येत होते. मस्तपैकी आम्ही जेवण करीत आराम करायचो. शेजारी-पाजारी गल्लीतलेच लोक होते, त्यामुळे आपण काही खूप वेगळ्या ठिकाणी गेलो असे वाटले नाही. डॉक्टर दररोज तपासणी करून गोळ्या देत होते. त्या घेत होतो. सासूबार्इंचे वय जास्त होते; पण त्यांनाही कोणताच त्रास नव्हता. आम्हालाही त्रास झाला नाही. दहा दिवस खाऊन-पिऊन ऐश केली. ११ व्या दिवशी घरी परतलो. आता घरात १४ दिवस थांबायला सांगितले आहे. या सूचनांचे पालन करीत आहोत. त्यामुळे कोणीही कोरोनाला घाबण्याचे कारण नाही. त्याला सहजपणे हरवता येते, असा विश्वासही सुभद्राबाई जाधव यांनी व्यक्त केला.
कुटुंबातील सात जणांनी सक्षमपणे केला सामना२३ वर्षीय युवक अभिजित मगरे म्हणाला, आई-वडिलांसह आम्हा तीन भावंडांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, तर चुलत भाऊ आणि चुलतीलाही बाधा झाली. माझ्या आई-वडिलांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. आम्हा भावंडांना कोणतीही लक्षणे नव्हती. जाताना खूप रडू आले. आई-वडिलांची काळजी वाटायची; पण सर्वांचे फोनवर बोलणे होऊ लागले. आई-वडिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना त्याठिकाणी सर्व उपचार मिळत होते. आम्हाला किलेअर्क येथे ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी कोणाला साधा खोकलाही नव्हता. जेवण मात्र व्यवस्थित मिळत नव्हते. बाकीची व्यवस्था चांगली होती. त्यामुळे लोकांनी कोरोनाची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. हा आजार म्हणजे काही मारून टाकतो, असे अजिबात नाही. सर्दी, खोकल्यासारखा नॉर्मल आजार आहे. त्यामुळे कोणाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मगरे म्हणाला. अभिजितच्या ४५ वर्षीय आई रेखा मगरे म्हणाल्या, दोन वेळा एक्स-रे काढले, ईसीजी सतत काढत होते. मधुमेह असल्यामुळे आठ इंजेक्शन दिले. त्यामुळे आम्हालाही काही वाटले नाही.च्शेजारच्या खोल्यांमध्ये गल्लीतील ओळखीचे होते. त्यामुळे मानसिक आधारही मिळाला. आता आम्ही सुखरूप आहोत. घराबाहेर पडायचे नाही, अशा सूचना आहेत. त्या पाळत असल्याचेही त्या म्हणाल्या.