औरंगाबाद : मोबाइल टॉवरचा कर, पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या वसुलीसाठी सोमवारपासून महापालिका स्वतंत्र मोहीम राबविणार आहे. रविवारी शहरातील काही इमारतींची झडती महापालिकेकडून घेण्यात आली. पाणीपट्टी- मालमत्ता कर वसूल करण्यात आला. ही मोहीम अधिक वेगाने सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे कर निर्धारण अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले.
शहरात ६२८ मोबािल टॉवर आहेत. त्यातील ५८६ टॉवर महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आले आहेत. शनिवारपासून महापालिकेने मोबाइल टॉवरच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. ३४ कोटींची थकबाकी त्यांच्याकडे आहे. शनिवारी १८ टॉवर स्वीकारण्यात आले. रविवारी महापालिकेच्या वेगवेगळ्या झोन कार्यालयांनी कारवाईचा बडगा उगारला. उत्तमनगर जवाहर कॉलनी येथील अनधिकृत मोबाइल टॉवर सील केला होता. आज ज्या इमारतीवर टॉवर होते त्या इमारतीचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. किराडपुरा भागात एक मोबाइल टॉवर सील करण्यात आले. ज्या इमारतीवर टॉवर होता त्या घरमालकाकडून थकीत मालमत्ता कर १० हजार रुपये वसूल करण्यात आले.
चिश्तीया कॉलनी येथे हाजी नूर खान यांच्या इमारतीवर इन्ड्स कंपनीचा मोबाइल टॉवर सील करण्यात आला. त्यांच्याकडून थकीत मालमत्ता कर ५० हजार रुपये भरून घेतले. याशिवाय, सिडको एन-१२ येथील इंदूबाई पाटील यांच्या घरावर असलेला टॉवर सील करण्यात आला होता. त्यांच्याकडून मालमत्ता आणि पाणीपट्टी कर असे मिळून ४३ हजार रुपये वसूल करण्यात आले. ही कारवाई महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अपर्णा थेटे, संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांनी पार पाडली.