छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. बहुतांश अपघात अतिवेगाने होत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे या मार्गावर अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांना किमान एक ते दोन तास समुपदेशनासाठी थांबविण्यात येणार आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सावंगी इंटरचेंज येथे दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक झाली. यावेळी राज्य रस्ता सुरक्षा कक्षाचे उपायुक्त भरत कळसकर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर येथील आरटीओ अधिकारी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी या महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. समृद्धी महामार्गावर १२० कि.मी. प्रतितास वेग मर्यादा देण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहनचालक यापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवितात. ही बाब अपघाताला आमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर नजर ठेवून टोल नाक्याच्या ठिकाणी अशा वाहनांच्या चालकांचे समुपदेशन करण्याचा पर्याय समोर आला आहे. हे समुपदेशन काही मिनिटांचे नव्हे, तर किमान एक ते दोन तासांचे असावे. त्यात चित्रफीत दाखविण्यापासून इतर अनेक माध्यमांचा समावेश राहणार आहे. आगामी काही दिवसांत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबरोबरच समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटवर स्पीकरद्वारे विविध सूचना देणे, महामार्गावर ठिकठिकाणी संदेशातून जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील हद्दीत ‘समृद्धी’वर किती अपघात?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर जानेवारीपासून आतापर्यंत तीन अपघात झाल्याची नोंद आहे. या तीन अपघातांमध्ये सहाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.