औरंगाबाद : जिल्ह्यात अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. खरिपाच्या पेरणीसाठी साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.
गेल्या वर्षात बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या पार्श्वभूमीवर जि.प. कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, बाजारात बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीसाठी तयार असली, तरी त्याला पावसाअभावी अद्यापही पाहिजे तसा उठाव नाही. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय प्रामुख्याने कापसाची लागवड करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनाही पाऊस पडल्यानंतरच कपाशीच्या बियाणांची विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. ज्या बियाणांना विक्रीची मान्यता आहे, अशाच बियाणांची विक्री करावी. मान्यता नसलेल्या कंपन्यांच्या आमिषांना बळी पडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत होते; परंतु अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहे. जिल्ह्यात कापूस, मका, उडीद, मूग आदींची पेरणी रखडली आहे. मागील वर्षात झालेला बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहता यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास ३० हजार हेक्टर घट अपेक्षित आहे.जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे असून, गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ती ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र एवढी अपेक्षित आहे.
यंदा खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र असेयंदा खरीप हंगामात लागवडीचे सरासरी क्षेत्र ७ लाख २० हजार हेक्टर एवढे निश्चित करण्यात आले आहे.गेल्या वर्षी ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र. गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड. यंदा १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित.