औरंगाबाद : विद्यापीठात आलेले विद्यार्थी कलाकार हे आपले पाहुणे आहेत. त्यांच्या जेवणात हयगय सहन करणार नाही. पाऊस येईल या दृष्टीने का तयारी केली नाही. आज चहा नाष्टा दिला का ? दुपारचे जेवण गुणवत्तेचे द्या. भोजन समितीने त्याची गुणवत्ता तपासा. दुपारी विद्यार्थी जेवणावळीत मी पुन्हा येऊन विद्यार्थ्यांना विचारेल. एकही तक्रार येता काम नये, असे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी भोजन व्यवस्था पाहणाऱ्या समितीसह इस्टेट विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला रविवारी सुरूवात झाली. त्यानंतर दुपारचे जेवण सुरळीत मिळाले. मात्र, रात्री पाऊस आणि विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने तारांबळ उडाली. संघ प्रमुखांनी व्यवस्थापनाकडे जेवण पुरले नसल्याची तक्रार केली. त्यामुळे कुलगुरूंनी सोमवारी सकाळी भोजन व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर पावसामुळे व्यवस्था कुलगुरू निवासस्थानाच्या शेजारून बॅडमिंटन हॉल येथे हलवण्यात आली आहे. प्रत्येक स्टेजवर स्थलांतरित भोजन व्यवस्थेची माहिती द्या. विद्यार्थ्यांच्या जेवणाची काळजी घ्या, अशा सुचना कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिल्या. यावेळी प्रकुलगुरूं डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ भगवान साखळे, संयोजक डॉ संजय सांभाळकर यांच्यासह केंद्रीय युवक महोत्सव नियोजनातील अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विचारले...नाश्ता करत असलेल्या विद्यार्थ्यांजवळ जावून कुलगुरूंनी नाष्टा मिळाला का ? चांगला आहे का? काही तक्रार असेल तर सांगा असे विचारले. विद्यार्थीनींनी आज सुरळीत आणि चांगला नाष्टा असल्याचे सांगितले.
चुकीच्या ठिकाणी का केली व्यवस्था ? बास्केटबॉल ग्राउंड वर का भोजन व्यवस्था केली ? तुंबलेले पाणी पाहून हे नियोजन चुकल्याचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले. दरवर्षी इथेच व्यवस्था करत असल्याचा सूर विद्यापीठाच्या इस्टेट विभागाने आवळला. त्यावर कुलगुरूंनी पाऊसाची शक्यता लक्षात घेऊन व्यवस्था का केली नाही असे विचारल्यावर अधिकारी निरुत्तर झाले.
एक दिवस आधी कार्यादेशकुलगुरूंनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर कंत्राटदार म्हणाले, सर एक दिवस आधी कार्यादेश मिळाले. तरी व्यवस्था उत्तम केली. रात्री ८०० लोक कुपण शिवाय वाढल्याने अडचण आली. आता तशी अडचण येणार नाही. तर इस्टेट विभागाच्या अधिकाऱ्यांत कंत्राटदार कुपण विक्रीत लक्ष केंद्रित करून चालबाजी करत असल्याची सांगत आहे. कधी २०० तर कधी पाचशे लोक वाढले असे म्हणत असून २००० चे विद्यार्थी कलाकारांचे जेवण देता आले नाही. तर आठशे लोक जेवणासाठी वाढल्याचा बहाणा करत असल्याची चर्चा अधिकाऱ्यांत सुरू होती.