औरंगाबाद : सुवासिक कालीमुछ तांदळाचे भाव ६५ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, शहरात स्वस्तात कालीमुछ ग्राहकांना मिळत आहे. हे व्यावसायिक स्पर्धेमुळे होतेय, असे तुम्हास वाटले तर तुम्ही चक्क फसलात म्हणून समजा. सुगंधी स्प्रे मारलेला आरएनआर तांदूळ कालीमुछ म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. यामुळे तांदूळ खरेदी करताना सावधान राहा.
कितीही भरपेट जेवण झालेले असू देत. पण सुगंधी तांदुळाच्या भाताशिवाय त्याला परिपूर्णता येत नाही. कालीमुछ तांदूळ आपल्या सुगंधाने आकर्षित करतो. यंदा या तांदुळाचे भाव ठोक विक्रीत ६० ते ६५ रुपये किलो झाले आहे. किरकोळ किराणा दुकानदार ७० रुपये दराने हा तांदूळ विकत आहे. काही दुकानदार मात्र ४७ ते ५० रुपये किलोने हा तांदूळ विकत आहेत. स्वस्तातील तांदुळाचा सुगंध गायब होतो, अशा तक्रारी वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांकडून वाढू लागल्या आहेत.
बाजारपेठेत शोध घेतला तेव्हा यातील सत्य बाहेर आले. ओरिजनल कालीमुछ तांदूळ चंद्रपूर जिल्ह्यातून येतो. मात्र, स्वस्तातील कालीमुछ हा कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आणला जात आहे. तो कालीमुछ नसून आरएनआर तांदूळ आहे. सुगंधी स्प्रे मारून तो कालीमुछ म्हणून विकला जात आहे. हा तांदूळ पाण्यात भिजविण्यास टाकला की, त्याचा सुगंध उडून जातो. हे दुकानदारांना माहिती आहे, पण ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ते काळाबाजार करीत आहेत. ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले की, आजघडीला बाजारात ३० टक्के ओरिजनल तर ७० टक्के डुप्लिकेट कालीमुछ विकला जात आहे. यावरून ग्राहकांची किती मोठी फसवणूक होते हे लक्षात येऊ शकते.
चौकट
असली - नकली कालीमुछ कसा ओळखावा?
* ओरिजनल कालीमुछ तांदूळ दिसण्यास पांढराशुभ्र असतो.
* डुप्लिकेट कालीमुछ थोडा पिवळसर दिसतो.
----
* ओरिजनल कालीमुछ तांदुळाचा दाणा थोडा लांब असतो.
* डुप्लिकेट कालीमुछ तांदूळ आखूड असतो.
---
* ओरिजनल कालीमुछचा सुगंध सौम्यपण दीर्घकाळ टिकतो.
* डुप्लिकेट कालीमुछला स्प्रे मारल्याने सुगंध खूप येतो. त्यापुढे असली कालीमुछचा सुगंध फिक्का पडतो.
* ओरिजनल कालीमुछ तांदूळ पाण्यात भिजवला तरी त्याचा सुगंध राहतो.
* डुप्लिकेट कालीमुछला स्प्रे मारलेला असल्याने पाण्यात टाकताच सुगंध गायब होतो.