औरंगाबाद : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने हैदराबाद संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ६ बाद १२४ धावा केल्या. त्यांच्याकडून के. रोहित रायुडूने ३४ चेंडूंत एक चौकार व २ षटकारांसह ४७, बी. संदीपने २५ व तन्मय अग्रवालने २१ धावा केल्या. महाराष्ट्राकडून विशाल गितेने ३0 धावांत २ गडी बाद केले. समद फल्लाह, सत्यजित बच्छाव, नौशाद शेख व अझीम काझी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने विजयी लक्ष्य १८ षटकांत ३ गडी गमावून गाठले. महाराष्ट्राकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ४0 चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५४ धावा केल्या. नौशाद शेखने ३ चौकार व २ षटकारांसह ४२, राहुल त्रिपाठीने १६ व विजय झोलने ८ धावा केल्या. हैदराबादकडून एस. सकिथने ३८ धावांत २ गडी बाद केले.
महाराष्ट्राची हैदराबाद संघावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:43 PM