वैजापूर : वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्टला तालुक्यातील हिंगोणी येथे घडली होती. याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी करीत वीज कर्मचारी संयुक्त कृती समितीने काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत काम करणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
वैजापूर तालुक्यातील हिंगोणीसह परिसरातील तीन गावांचा वीज पुरवठा खंडित होता. हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीचे कर्मचारी गावात गेले होते. त्यावेळी गावातील काही लोकांनी वीज सुरू करण्यास मज्जाव केला. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय वीज पुरवठा पूर्ववत करू नका, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोणी गावात पोहोचले. मात्र, ते आल्यानंतर काही कळायच्या आतच बडवे यांच्यासह वरिष्ठ तंत्रज्ञ पवन महेर, अनिल वाळुंज, अफसर सय्यद, दीपक डुकरे यांना सुनील गिऱ्हे, काकासाहेब चंदने, नाना बोडखे, बाळू काळे, मदन थोरात, सुरेश मिटकर, मनोज काळे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, विद्युत कायद्याखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चौकट
आरोपींना अटक करेपर्यंत काम करणार नाही
अभियंता व कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी कर्मचारी संतप्त झालेले असून, सोमवारपासून त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत वैजापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात आरोपींना जोपर्यंत अटक करीत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत.