औरंगाबाद : खाम नदी पुनरुज्जीवित होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या औरंगाबादकरांसाठी खूशखबर आहे. नदी पात्राच्या सौंदर्यीकरणात आणखी भर पडत आहे. ती म्हणजे, नदीच्या काठावरील २४४ फूट लांबीच्या भिंतीवर खामनदीचा उगम ते गोदावरी नदीत संगमापर्यंतचा ७२ किमींचा वाहत प्रवास चित्र रुपात साकारला जात आहे.
पर्यटनाची राजधानी औरंगाबाद शहर ज्या नदीच्या काठावर वसले आहे ती खाम नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा विडा महानगरपालिका, छावणी परिषद, काही सामाजिक संस्था, अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांनी उचलला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून नदीच्या पात्राची स्वछता व सौंदर्यीकरण सुरू आहे. तब्बल ४०० वर्षांपूर्वी खामनदीच्या काठावर शहर वसले होते. मागील ७० वर्षांत या नदीचे रूपांतर नाल्यात झाले. या खाम नदीचा इतिहास व तिचा उगम ते संगमापर्यंतचा प्रवास नव्यापिढीला माहीत व्हावा, या उद्देशाने नदी प्रवास चित्र रुपात साकारला जात आहे. छावणी परिषद बाजूच्या नदी पात्रापासून या नदीच्या सौंदर्यीकरणाला सुरुवात झाली आहे. आयकर भवनला लागून असलेल्या २४४ फूट लांबीच्या संरक्षण भिंतीवर चित्र काढण्यास सुरुवात झाली आहे. चित्र अब्दुल रशीद, सुंदरलाल कुमावत, दीपक कुमावत व प्रवीण देवळे साकारत आहेत. नदीच्या प्रवासाचे डिझाइन साई सावंत यांनी रेखाटले आहे. एवढेच नव्हे तर नदीवरील उड्डाणपूल व नदीपात्रातील पाईपला रंगीत करण्यात आले आहे. पात्राच्या दोन्ही बाजूला दगडांचा थर रचला जात आहे.
नदी परिक्रमा सारखी अनुभूतीसातारा पर्वतरांगा आणि जटवाडाच्या डोंगरामधून दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम झाला आहे. त्यानंतर ही खाम नदी हर्सूल धरणात येऊन मिळते. तिथून हिमायत बागचा मागून बीबी का मकबरच्या पूर्व बाजूने पुढे जाते. मकाई गेट, पानचक्की, मेहमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा उड्डाणपुलाखालून जाते. छावणी परिषदच्या पूर्व बाजूने कर्णपुरा देवीच्या मंदिरच्या बाजूने पुढे गंगापूर तालुक्यातील येसगाव येथपर्यंत वाहत जाऊन खाम नदी अखेर गोदावरी नदीत म्हणजेच नाथसागरात जाऊन मिळते. हा ७२ किमींचा प्रवास चित्ररूपात साकारला जात आहे. हे चित्र पाहताना नागरिकांना खाम नदी परिक्रमा करून आल्याची अनुभूती येईल.