- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : लांबसडक, काळेभोर व दाट केशसंभार हा महिलांचा अनमोल दागिनाच. सौंदर्य खुलविणारा. चार चांद लावणारा. म्हणूनच या केशसंभारावर प्रियकर दिवाने होतात. ‘हैरान हू मै आपके जुल्फो को देखकर’ म्हणत प्रियराधना करतात. जटा सावरत सामोरी येणाऱ्या ललनेची छबी व अनेक गीतेही गाजली आहेत. सध्या ‘फुगे घ्या फुगे, केसावर फुगे’ हे लोकगीत डीजेवर धुमाकूळ घालते आहे; पण आता या केसांना सोन्याचा भाव देखील मिळतो आहे. किलोभर केसाच्या बदल्यात चक्क ग्रॅमभर सोनं तुम्ही विकत घेऊ शकाल.
होय, तुम्ही वाचले ते खरंय. औरंगाबादेतमहिलांच्या ५० ग्रॅम केसांना २०० रुपयांहून अधिक भाव मिळतो आहे. त्यामुळे महिलांनी डोकं विंचरताना गळालेल्या केसांचा पुंजका फेकणे बंद केलेय. आता प्रत्येक पुंजका तन्मयतेने साठवून ठेवला जातो आहे. पूर्वी गल्लीबोळातून केसावर फुगे खरेदी केले जात. मग फुग्यांची जागा साखरेने घेतली. पुढे रोख पैसे दिले जाऊ लागले. आता मात्र ‘केस... २०० रुपये छटाक’ असे ओरडत काही खरेदीदार गल्लीबोळातून फिरताना दिसतात. दीड वर्षापूर्वी २ हजार रुपये किलोने विकले जाणारे केस सध्या दुप्पट भावाने खरेदी केले जात आहेत. केसांना कमीअधिक ४ हजार रुपये किलो भाव आल्याने महिला केस जपून ठेवत आहेत.
विदेशात भारतीय केसांना मोठी मागणी आहे. त्यापासून केसांचे विग, हेअर पीसेस बनविले जातात. व्याधीग्रस्त महिलांच्या डोक्यावरील केस निघून जातात. त्यांना हेच विग वापरावे लागतात. मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे केस खरेदीवर मोठा परिणाम झाला होता. आता या व्यवसायात तेजी आली आहे. शहरात ४० पेक्षा अधिक किरकोळ विक्रेते केस खरेदी करतात. सोबत पिशवी व अमूल्य वस्तू मोजण्यासाठीचा छोटा तराजू असतो. दरमहिन्याला शहरात ४० ते ५० किलोपेक्षा अधिक केस जमा होतात. नाशिकचे मोठे व्यापारी शहरात येऊन हे केस खरेदी करतात. काळ्या, निरोगी केसांना जास्त भाव मिळतो. या विक्रेत्यांकडे काळे, लाल, सोनेरी, सरळ, कुरळे केस असे प्रकारही असतात. भारतातून युरोप, आफ्रिका, कॅनडा आदी देशांत केसांची निर्यात होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
महिन्यात जमतात ५० ग्रॅम केसडोक्यावर असताना लांबसडक केस महिलांचे सौंदर्य खुलवतात. तर तेच केस गळाल्यानंतरही पैसे मिळवून देतात. एक महिला साधारणता महिनाभरात ५० ग्रॅम केस जमा करते. ज्यांचे केस लांबसडक आहेत, त्यांच्याकडे १०० ग्रॅम केसांचा पुंजका सहज जमतो.
केसाच्या बदल्यात स्टिलचे भांडेकेस खरेदीमध्ये आता जुने कपडे खरेदीदारही उतरले आहेत. त्यांनी रोखीऐवजी स्टिलचे भांडे देण्यास सुरुवात केली आहे.