औरंगाबाद : आई-वडिलांकडून मला ‘आयएएस’ होण्याची प्रेरणा, तर शिक्षकांकडून मला चांगले ज्ञान, संस्कार व प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. शिक्षकांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही, अशी कृतज्ञ भावना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांनी व्यक्त केली.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या मातीत जन्मलेले सनदी अधिकारी तथा महावितरणचे नवनियुक्त सहव्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांच्याशी बातचीत करताना त्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणी व काही प्रसंग कथन केले. ते म्हणाले, मी नांदेड येथील नवनिकेतन प्राथमिक शाळेत पहिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर विवेकवर्धिनी प्राथमिक शाळेत दुसरी ते पाचवीपर्यंत व पीपल्स हायस्कूलमध्ये सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर अकरावी आणि बारावीपर्यंत नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये शिकलो. त्याठिकाणी माझे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पुढे बिटस् पिलानीमध्ये इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक्स विषयात बीई आॅनर्स पदवीपर्यंत शिक्षण घेतले. एकंदरीत मला लहानपणापासूनच खूप चांगले शिक्षक भेटले. दहावीपर्यंत मला अभ्यासाबरोबर हिंदी, चित्रकला, सामान्य ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षकांनी प्रोत्साहित केले. स्पर्धा परीक्षांची मी जवळपास १०० प्रमाणपत्रे जमा केली.
मोठे स्वप्न बघण्याची हिंमत आली...विवेकवर्धिनी प्राथमिक शाळेत असताना शिक्षिका जोशी, शिक्षिका पुराणिक, त्यानंतर पीपल्स हायस्कूलमध्ये गणिताचे शिक्षक येवतीकर, बैनवाड, नागरगोजे, इंग्रजी विषयाचे रसाळे आणि कुंभार, इतिहासाच्या शिक्षिका मोरे, हिंदीच्या पाथरूडकर या सर्व शिक्षकांचे योगदान मी विसरू शकत नाही. या शिक्षकांनी केलेले चांगले संस्कार, त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कमी कालावधीत माझ्या ज्ञानाची कक्षा रुंदावल्या आणि मोठे स्वप्न बघण्याची हिंमत आली. नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्येही माझे वडील जे फिजिक्सचे प्राध्यापक होते तेथे केमिस्ट्रीचे वैद्य, इलेक्ट्रॉनिक विषयाचे ठाकूर आणि इंग्लिशचे कुमठेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अकरावी-बारावीत चांगले यश मिळाल्यामुळे आयुष्यात मोठे आव्हान पेलू शकतो, असा माझ्यात आत्मविश्वास वाढला.
विद्यार्थ्यांनी बारकाईने लक्ष द्यावे शिक्षकांचे आपल्यावर कळत-नकळत चांगले परिणाम होत असतात. त्यामुळे शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांची जिज्ञासा, कुतूहल आणि उमेद वाढेल असे अध्यापन करावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीदेखील शिक्षकांकडून चांगले ज्ञान संपादन करण्यासाठी बारकाईने लक्ष द्यावे, असेही रेखावार म्हणाले.