औरंगाबाद : शहरात दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ डेंग्यूने आरोग्य यंत्रणेला अक्षरश: जेरीस आणले होते. डेंग्यूच्या उद्रेकाने अनेकांचा बळी घेतला होता. हीच परिस्थिती आता पुन्हा एकदा उद्भवण्याची चिंता व्यक्त होत आहे. कारण, शहरात सध्या कोरोनापेक्षा डेंग्यू, चिकुनगुनिया आणि तापाचे रुग्णच झपाट्याने वाढत आहेत. सप्टेंबरच्या अवघ्या २० दिवसांत ७८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. ही फक्त शासकीय यंत्रणेत नोंद झालेली आकडेवारी आहेत. प्रत्यक्षात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयातील खाटा भरून गेलेल्या आहेत.
एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. त्याची झपाट्याने पैदास होते. याच डासामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लागण होते. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि त्यातून डेंग्यू, डेंग्यूसदृश, चिकुनगुनिया आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षात घेता रुग्णांचा आकडा वाढू शकतो; परंतु आरोग्य यंत्रणा परिस्थिती चिंताजनक नसल्याचाच दावा करीत आहे.
आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतनात व्यस्त आहे. या सगळ्यात डेंग्यूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. पडेगाव, सिडको, एन-६, मिसारवाडी, बेगमपुरा, बुढीलेन, हर्सूल, चिकलठाणा, टीव्ही सेंटर, आरेप काॅलनी, आसेफिया काॅलनी, रोहिलागल्ली, टाऊन हाॅल, एस.टी. काॅलनी, राहुलनगर, पैठण गेट, छावणी या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे.
---
रुग्णसंख्येत वाढ
डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आमच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण भरती होण्यासाठीच येतात.
- डाॅ. राजश्री रत्नपारखी, डाॅ. हेडगेवार रुग्णालय
----
सात दिवसांत १५ रुग्ण
गेल्या ७ दिवसांत डेंग्यूच्या १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या ४ रुग्ण दाखल आहे. यात दोघांची प्रकृती चांगली आहे. ओपीडीत चिकुनगुनियाचे रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक आहे.
- डाॅ. हिमांशू गुप्ता, सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटल
------
किमान ६ ते १० दिवस उपचार
डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जवळपास ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एका रुग्णाला किमान ६ ते १० दिवस रुग्णालयात रहावे लागते. रुग्णालयातून गेल्यानंतरही काही दिवस त्रास होत असतो.
- डाॅ. अजय रोटे, युनायटेड सिग्मा हाॅस्पिटल
-----
१० पैकी ५ डेंग्यूचे रुग्ण
सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया आणि तापेच्या रुग्णांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. राऊंड घेण्यासाठी वेळही अपुरा पडतो. तापेच्या १० रुग्णांपैकी ४ ते ५ जण डेंग्यूचे रुग्ण आहेत. प्रत्येक वार्डात कमी-अधिक प्रमाणात रुग्ण भरती आहेत. कोरोना रुग्णांसह याही रुग्णांवर उपचार केले जात आहे.
- डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी
-----
ताप अंगावर काढू नये
डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनीही घर, परिसरात जास्त दिवस पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही ताप अंगावर काढता कामा नये.
- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी
-------