औरंगाबाद : बीड बायपास हा मृत्यूचा सापळा बनलाय, असे म्हणतात ते उगीच नाही. आठवडाभरात या रस्त्यावर लागोपाठ तीन अपघात झाले असून, यात चार जणांना प्राण गमवावे लागल आहेत. रविवारी दुपारी सायकलवरून पाण्याचे कॅन घेऊन जाणाऱ्या एका वॉचमनला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक बसून ते जागीच ठार झाले. एमआयटीच्या अलिकडे रेण्डोज हॉटेलसमोर दुपारी १.३० वाजता हा अपघात झाला.
वसंत रामभाऊ अंभोरे (५५, मूळ रा. वंडाळी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा, ह. मु. साईकृपा हॉस्पिटल परिसर) असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते कुटुंबासह साईकृपा हॉस्पिटल परिसरात राहात होते. मयत वसंत अंभोरे हे दिशानगरी येथील साईकृपा हॉस्पिटलमध्ये वॉचमनचे काम करत होते. निशांत हॉटेलसमोरून गेलेल्या पाईपलाईनच्या वॉलला गळती लागली असून, आजुबाजूचे लोक तेथून पाणी भरतात. रविवारी दुपारी वसंत अंभोरे यांनी तेथून पाण्याचे कॅन भरले व दुभाजक ओलांडून सायकलवरून ते दिशानगरीकडे (एमआयटीच्या दिशेने) निघाले होते. तेव्हा मास्टरकूक हॉटेलकडून एमआयटीच्या दिशेने भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच १२ एमव्ही २०९८) वसंत अंभोरे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ट्रकचे चाक अंभोरे यांच्या अंगावरून गेल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात रोडवर पडले. आजुबाजूच्या नागरिकांनी ट्रकला थांबवून जोरदार दगडफेक केली.
या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा ट्रकचालक मोहम्मद आरेफ खान अब्दुल हमीद खान (३४, रा. मेवात, हरियाणा) पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ट्रकसह त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अंभोरे यांचा मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या टू मोबाईल व्हॅनचे सहायक फौजदार देशपांडे, एम. एस. झोडपे आणि होमगार्ड आर. के. शेख यांनी घाटीत नेला. सायंकाळी अंभोरे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. अंभोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड बायपासवर अपघाताची मालिकाबीड बायपासवर या आठवड्यात अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली. २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास गोदावरी टी पॉईंट वाहतूक सिग्नल पार करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वार कुटुंबाला उडवले. यात ६ वर्षांच्या स्वाती उर्फ सोनी बाबासाहेब खंडागळे ही बालिका चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली, तर तिचे आई, वडील, लहान बहीण जखमी झाली. २७ जानेवारी रोजी बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कामावर निघालेल्या दुचाकीस्वार आत्ये, मामेभाऊ तरुणांना नाईकनगर कमानीजवळ भरधाव ट्रकने चिरडले. आज याच रस्त्यावर एमआयटीच्या अलिकडे रेण्डोज हॉटेलसमोर दुपारी १.३० वाजता सायकलवरून पाण्याचे कॅन घेऊन जाणाऱ्या वसंत अंभोरे यांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक बसून ते जागीच ठार झाले.