बीड : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे उचलले आहे. शहरातील अधिक वर्दळ असणाऱ्या ६० ठिकाणी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गुरुवारी उपअधीक्षक गणेश गावडे यांनी यासाठी स्थळनिश्चिती केली.गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी शहरात रहदारीच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. गतवर्षी नियोजन विकास समितीने याकरिता ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ई-टेंडरिंगद्वारे निविदा मागविण्यात आल्या. सर्वांत कमी दराची ई-निविदा मंजूर करण्यात आली असून, उच्च दर्जाचे सीसी टीव्ही कॅमेरे आता शहरात बसविण्यात येणार आहेत.उपअधीक्षक गणेश गावडे यांनी बुधवारी सीसी टीव्ही बसविण्याकामी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शहरातील तिन्ही ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर, पेठबीड व बीड शहर ठाणे हद्दीत हे कॅमेरे बसविण्यात येणार असून, सरासरी २० कॅमेरे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असतील. फेब्रुवारी महिनाअखेरपर्यंत हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येतील. त्याचे नियंत्रण अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे, अशी माहिती उपअधीक्षक गावडे यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)
बीड शहरावर आता ‘तिसरा डोळा...!’
By admin | Published: February 02, 2017 11:19 PM