लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नदीजोड प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या आधारावरच पश्चिम महाराष्ट्रातील निरा आणि भीमा या दोन नद्यांचे पाणी एका नदीच्या पात्रातून दुस-या नदीच्या पत्रात आणून हे पाणी मराठवाड्यातील सतत दुष्काळाच्या छायेखाली असणा-या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार हेक्टर शेतीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सध्या नदीजोड प्रकल्पांतर्गत चालू असलेले हे काम पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उध्दट येथे युध्दपातळीवर सुरु आहे.सतत जास्त पाऊस असणा-या विभागातील पावसाचे पडलेले वाहून जाणारे पाणी एका नदीच्या पत्रातून वळवून दुस-या नदीच्या पात्रात आणून या पाण्याचा वापर त्या विभागातील सिंचनासाठी करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची कल्पना पुढे आली. या प्रकल्पांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील मिरा आणि भीमा नदीच पाणी एकत्र आणून मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सिंचनासाठी आणले जाणार आहे.या प्रकल्पाचे काम सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उध्दट या गावालगत युध्दपातळीवर सुरु आहे. या ठिकाणी निरा नदीच पाणी जमिनीच्या १०० ते १५० फुट खोल बोगद्यातून उजणीच्या पाणलोट क्षेत्रात सोडले जाणार आहे. मीरा नदीच पाणी भीमा नदीत उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील भागलवाडी येथे २४ किमी च्या बोगद्यातून आणण्यात येणार आहे.हे पाणी पुढे करमाळा तालुक्यातील जेवूर येथून सीनाकोळेगाव या धरणात २७ किमीच्या बोगद्यातून सोडण्यात येणार असून सीना नदीत हे पाणी सोडले जाणार आहे. या पाण्याचा उपयोग बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर शेती सिंचनासाठी केला जाणार आहे.
बीड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या ३४ हजार हे. जमीन सिंचनासाठी नदी जोड प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:15 PM