औरंगाबाद : 'मशिदीवरील भोंगे हटाव' मोहीम सुरु केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेच्या पूर्वी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोंग्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रार्थना स्थळांवर भोंगे लावण्यासाठी तातडीने परवानगी घ्यावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. यामुळे औरंगाबादमध्येही आता भोंग्याबाबतचा नाशिक पॅटर्न लागू होणार आहे.
मनसेकडून राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात सध्या लाऊडस्पीकरवरून विविध मुद्दे आता समोर येत असताना औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोंगे लावायची असतील तर कायदेशीर परवानगी घ्या असे आवाहन केले आहे. जर कोणत्याही ठिकाणी अनधिकृत लाऊडस्पीकर आढळून आले तर कारवाई केली जाईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
लाऊड स्पीकर संदर्भामध्ये सर्वोच न्यायालयाने वर्ष 2005 मध्ये आणि राज्य सरकारने जो काही जीआर काढलेला आहे त्यानुसार लाऊड स्पीकर परवानगीशिवाय लावता येत नाही, अशी माहिती देखील पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.