कन्नड (औरंगाबाद): सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या भीक मांगो आंदोलनाने शहर दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास सुरुवात झाली. शासकीय कार्यालये, गुत्तेदार तसेच सर्व सामन्यांकडे भीक मागितल्यावर पंचायत समिती प्रांगणात आंदोलनाची समाप्ती झाली. आंदोलनात राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील भीक मागो आंदोलन केले, यातून जमा झालेले १ हजार ९२३ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आल्याची माहिती आहे.
आमदार उदयसिंग राजपुत यांनी विधान सभेत अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदारांना मुंबईत घरे देण्याची आर्त मागणी केली. वास्तविक आमदार हा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करित असल्याने मतदार संघातील प्रश्न, गोर गरीब सर्व सामान्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असतांना आमदारांना मुंबईत घरे देण्याची मागणी करून मतदार संघाची बदनामी केली. त्यामुळे आमदाराची मुंबईतील घराची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अधिकारी, गुत्तेदार तसेच सर्व सामान्य जनतेकडे भीक मागण्यात येईल व त्यातून जमा होणारा पैसा विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला जाणार आहे. असे संतोष कोल्हे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगताना सांगितले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शहरातील फकीरही सहभागी झाले होते. फकिर का घर आमदार को दो अशा घोषणाही त्यांनी दिल्या.
फाटके कपडे घालून हर्षवर्धन जाधवांनी मागितली भीकशहरात रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीनेही भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यात स्वत: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी फाटके कपडे घालून भीक मागितले. यात सर्व पक्षीय आमदारांना घरे देण्यासाठी भीक मांगून १ हजार ९२३ रुपयांचा मदत निधी जमा करण्यात आला. हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी तहसिल कार्यालयात जमा करण्यात आला. भिकेत मागितलेले पैसे राज्य सरकारने स्विकारले आहेत, असे उपरोधिकपणे हर्षवर्धन जाधव म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत इशा झा व कार्यकर्ते उपस्थित होते.