लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाविद्यालयात अपयशी ठरलेले बिल गेटस्, वॉरेन बफे यांच्यासारखे अनेक लोक जीवनात यशस्वी ठरल्याची उदहारणे आहेत. या सर्व लोकांनी ग्रंथालयात केलेले वाचन, चिंतनातूनच त्यांना आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग सापडला, असे प्रतिपादन ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनात मान्यवरांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञानस्रोत केंद्रात २१ व २३ आॅगस्टदरम्यान दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, डॉ. प्रवीण वक्ते, संचालक डॉ. धर्मराज वीर उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनात ज्ञानस्रोत केंद्रात जतन केलेले १६५० ते १८०० या कालखंडातील दुर्मिळ ग्रंथ, राजे श्याम राजे यांचे हस्तलिखित ग्रंथ व इतर मौलिक ग्रंथ मांडण्यात आले आहेत.याशिवाय थोर व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे, संस्कारक्षम ग्रंथ, स्त्रियांचे ग्रंथ, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, डॉ.अब्दुल कलाम यांच्यावरील ग्रंथ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार नियतकालिके, विद्यापीठातील, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार नियतकालिके आणि विद्यापीठातील प्राध्यापकांनी लिहिलेले ग्रंथही प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. हे दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ग्रंथालयाचे संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी केले आहे.
विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:05 AM