औरंगाबाद : मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी शनिवार, दि.१२ जानेवारीपासून महापालिकेने विशेष अभियानाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मनपाकडे २३ लाख रुपये भरले. सुटीचा दिवस असतानाही मनपात कराची रक्कम भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
चालू आर्थिक वर्षात मालमत्ताधारकाने कर न भरल्यास मनपाकडून २४ टक्के व्याज लावण्यात येते. मालमत्ता करापोटी शहरात ३५० कोटींहून अधिक थकबाकी आहे. मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे मालमत्ता करातील विलंब शुल्कात सूट देऊन थकबाकीदारांना पैसे भरण्याचे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत दोन वेळा मोहीम राबविण्यात आली. नोव्हेंबर २०१८ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत मनपाला ११ कोटी रुपये मिळाले होते. पुन्हा एकदा मोहीम राबविण्यात येत असून, ३१ जानेवारीपर्यंत नागरिकांनी थकीत रक्कम भरल्यास विलंब शुल्कात ५० टक्के सूट दिली जाणार आहे.
शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दिवसभरात मालमत्ता करापोटी १८ लाख ४० हजार ४१४ रुपये, तर पाणीपट्टीचे ४ लाख ९३ हजार रुपये वसूल झाले. शाहगंज येथील मशिदीच्या दुकानांचा वाद सुरू होता. न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र, महापालिकेने कर भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, अजय शहा, नारायण राठी, मशिदीचे मुतवल्ली सय्यद मजहर यांच्यासह व्यापाºयांनी ९ लाख ७० हजार रुपयांचा भरणा केला.सांडू बचके यांना नव्यानेच कर लागला आहे. त्यांनी देखील आजच कर मूल्यनिर्धारक व संकलक महावीर पाटणी यांच्याकडे कराचा भरणा केला.