औरंगाबाद : गणेशोत्सवानंतर शहरवासी ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या नवरात्रोत्सवाला उद्या २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. येथे शहरात नऊ दिवस आदिशक्तीचा जागर करण्यात येणार आहे. विविध भागांतील देवीच्या मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली असून, विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा येथील देवीच्या मंदिरात पहाटे ३ वाजेपासून महापूजेला विधिवत सुरुवात होणार आहे. सकाळी ६ वाजता घटस्थापना करण्यात येईल. ७.२५ वा. मंदिरात देवीची आरती करण्यात येणार आहे. यानंतर कर्णपुरा यात्रेला सुरुवात होईल. शहरातील प्रती माहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको एन-९ येथील रेणुकामाता मंदिरातही सकाळी पूजा, घटस्थापना व आरती करण्यात येणार आहे. दररोज दुपारी मंदिरात विविध भजनी मंडळ भजन जोगवा म्हणणार आहेत. बीड बायपास रोडवरील संग्रामनगरचे हरिहर सद्गुरू शक्तिपीठ येथे शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. येथे दररोज पहाटे ५ वाजता प्रात:स्मरण, ६ वाजता शास्त्रीय संगीत सेवा, ९ वाजता आरती, ९.३० वाजता स्तुती, स्तोत्र पठण व प्रदक्षिणा, दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद वाटप. १ ते ३ वाजेदरम्यान श्रीशक्ती सामर्थ्य ग्रंथ पारायण, ४ ते ५.३० वाजेदरम्यान भक्तिसंगीत सेवा, सायंकाळी ६ वाजता राजोपचार पूजा, ७ वाजता आरती व रात्री ९.३० ते ११ वाजेपर्यंत पंचपदी (भजन) होणार आहे. रंगारगल्ली येथील हिंगुलंबिका देवीची मिरवणूक दुपारी २ वाजता निघणार आहे. सिटीचौक, मछली खडक, गुलमंडीमार्गे मिरवणूक मंदिरात येणार आहे. वीरशैव लिंगायत महिला मंडळातर्फे दुपारी ४ वाजता देवीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पानदरिबा ते संगमेश्वर मठ, फकीरवाडी यादरम्यानही मिरवणूक काढण्यात येणार आहे. अयोध्यानगर दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीतर्फे देवीची स्थापना करण्यात येणार आहे आणि नऊ दिवस देवीची उपासना आणि विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिशक्तीच्या उत्सवाला आजपासून सुरूवात
By admin | Published: September 25, 2014 12:56 AM