औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच उस्मानाबाद उपपरिसरातील सर्व विद्याशाखांतील बारावी उत्तीर्ण या पात्रतेवरील अभ्यासक्रमांचे प्रवेश ई सुविधा केंद्रामार्फत ऑनलाइन होणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यापीठात बुधवारपासून ९ पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून, प्रवेशासाठी सीईटी नसणार आहे. गुणवत्तेच्या आधारे १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन तत्काळ वर्ग सुरू होतील, असे विद्यापीठाकडून कळवण्यात आले.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली ९ आणि १२ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांसाठी २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. बारावीनंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार असून, विद्यापीठातील बी. व्होक ऑटोमोबाइल इंडस्ट्रीयल ऑटोमेशन (पदवी), ॲडव्हान्स डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ग्राफिक्स आर्ट्स ॲडव्हान्स (डिप्लोमा), सर्टिफिकेट ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन, फ्रेंज (डिप्लोमा), ॲडव्हान्स डिप्लोमा ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन, फ्रेंच (ॲडव्हान्स डिप्लोमा), बी. ए. जनसंवाद व वृत्तपत्र विद्या (पदवी), बॅचलर ऑफ परफॉमिंग आर्टस् बी.पी.ए, (पदवी), बी. एफ.ए. ब्रीज कोर्स (पदवी एक वर्ष), सर्टिफिकेट इन मोडी स्क्रिप्ट (पदविका) या विषयांचा समावेश आहे. प्रवेशासाठी सीईटी असणार नाही तर गुणवत्तेच्या आधारावर ४ ते १४ सप्टेंबरदरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊन शासन निर्णयानुसार तासिकांना सुरुवात होईल, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे यांनी कळविले आहे.