औरंगाबाद : गणेशोत्सवात यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी आध्यात्मिक, सामाजिक संदेश देणारे देखावे तयार केले आहेत. यासाठी मागील १५ दिवसांपासून कार्यकर्ते जोरात तयारी करीत होते. बुधवारी बहुतेक देखावे गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आले. यात नृसिंह अवतारापासून ते चांद्रयान-२ प्रक्षेपणापर्यंतचे विषय हाताळण्यात आले आहेत.
गणेशोत्सवात सामाजिक संदेश देऊन जाणीव जागृती करण्याची शहराची परंपरा यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांनी जपली आहे. गणेश मंडळाच्या कल्पकतेची चुणूक सध्या शहरात पाहावयास मिळते आहे.
चांद्रयान-२ चे प्रेक्षपणसिडको एन-६ परिसरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाने ‘चांद्रयान-२’चा देखावा साकारला आहे. फाईव्ह, फोर, थ्री, टू, वन, असे आकडे सर्वांच्या कानावर पडतात आणि प्रचंड आवाज होतो. धूर निघायला लागतो, अग्नी प्रज्वलित होतो आणि चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होते. हे चांद्रयान वर गेल्यावर चंद्रावर त्याचे कसे लँडिंग होते हेसुद्धा बघावयास मिळत आहे. यांत्रिकी करामतीवर आधारित या देखाव्यासाठी १७ फूट उंचीच्या चांद्रयानाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हे यान ६५ फूट उंचीवर जाते. तेथे गच्चीवरील आभासी पोकळीत आपणास चंद्राची प्रतिकृतीही दिसते. ७ सप्टेंबर रोजी इस्रोचे चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार आहे. योगायोगाने याच काळात गणेशोत्सव आला आहे. चांद्रयान-२ बद्दल लहान-थोरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. याची प्रचीती देखाव्याला होणाऱ्या गर्दीवरून दिसते.
नृसिंह अवतार जाधवमंडी येथील यादगार गणेश मंडळाने आध्यात्मिक देखाव्याची परंपरा जपत यंदा ‘नृसिंह अवतार’ भव्य देखावा उभारला आहे. हिरण्यकश्यपू राजा ‘स्वत:ला ईश्वरापेक्षा मोठा समजत असे.’ मात्र, त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद नेहमी ‘नारायण नारायण’ असे नामस्मरण करीत असे. एकदा राजा चिडून त्यास म्हणाला की, दाखव तुझा देव कुठे आहे. प्रल्हाद म्हणाला की, तो सर्वत्र आहे. यामुळे आणखी चिडलेल्या राजाने एका मोठ्या खांबावर लाथ मारली. त्याच वेळी प्रचंड आवाज झाला व खांबाचे दोन तुकडे झाले. त्यातून नृसिंह प्रकटला. नृसिंहाने हिरण्यकश्यपू राजाला मांडीवर घेतले व नखाने त्याचे पोट फाडले.हा ८ ते १० मिनिटांचा देखावा पाहताना शहरवासी हरखून जातात. यासाठी १७ फूट उंचीची महाकाय नृसिंहाची मूर्ती तयार केली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बाप्पा सांगतात पबजी गेमचा धोका पोकोमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या गेम्सनी मुलांना वेड लावले असताना आता त्यात पबजी गेमची भर पडली आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि अॅक्शनमुळे हा गेम लहान मुले व तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनत आहे. मात्र, या गेमचा धोकाही तेवढाच वाढला आहे. तासन्तास मुले यात रमून जातात. मुंबईत एका तरुणास पालकांनी मोबाईलवर पबजी खेळण्यास मनाई केल्याने त्याने आत्महत्या केली. याच घातक व धोकादायक गेमवर प्रकाशझोत टाकणारा देखावा शिवशंकर कॉलनीतील राजयोद्धा गणेश मंडळाने तयार केला आहे. पबजी खेळू नका, असा संदेश खुद्द गणेश बाप्पा देत आहे, असे यात दाखविण्यात आले आहे.
औरंगपुऱ्यात शिवकालीन राजवाडाऔरंगपुऱ्यातील बाळकृष्ण मंदिराबाहेरील बाजूस शिव स्वराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळाने शिवकालीन राजवाड्याचा दर्शनी भाग उभारला आहे. रात्री विद्युत रोषणाईत हा राजवाडा खुलून दिसतो.
नागेश्वरवाडीत पांढरा शुभ्र राजवाडानागेश्वरवाडी येथील महाकाली प्रतिष्ठान गणेश मंडळानेही राजवाड्याचा दर्शनी भाग उभारला आहे. या दोन ते तीन मजली देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण राजवाडा पांढरा शुभ्र आहे, तसेच नक्षीकामही सुरेख झाले आहे. येथील १३ फूट उंचीची महाकाली गणेशाची मूर्तीही लक्षवेधक आहे.