लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या वारीला औरंगाबादेत शनिवारपासून सुरुवात झाली. शिक्षणाच्या वारीला राज्यभरातील हजारो उर्दू शिक्षकांनी हजेरी लावली.येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरू झालेल्या या नियोजित वारीचे उद्घाटन शनिवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार होते; परंतु काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे तावडे यांनी ऐनवेळी औरंगाबादचा दौरा टाळला. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारीत सहभागी शिक्षकांना शुभेच्छा देत संवाद साधला. त्यानंतर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते या वारीचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी पाटील डोणगावकर, शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके, सहायक शिक्षण उपसंचालक एम.के. देशमुख, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुनील मगर, डॉ. सुभाष कांबळे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, गजानन सुसर, श्रीकांत कुलकर्णी, मंत्रालयीन समन्वयक पिराजी पाटील, अंकुश बोबडे, दत्तात्रय वाडेकर, रणजित देशमुख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी तावडे म्हणाले, प्राचीन काळापासून उर्दू भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्येही स्वातंत्र्यसैनिकांनी इनक्लाब जिंदाबादचा नारा दिलेला होता. हा नारादेखील उर्दूतच होता. अतिशय गोडवा असलेल्या उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यातील १३०० शाळा समायोजित करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले आहे. तावडे यांनी उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शासन राबवत असलेल्या विविध उपक्रमांवर त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पुरुषोत्तम भापकर आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले, गुणवत्तेचा ध्यास प्रत्येक शिक्षकाने घेऊन उर्दू भाषेला अधिक दर्जेदार बनवावे. सर्व शिक्षकांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळा आदी उपक्रमांतून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यात सर्वांनी एकजुटीने कार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षणाला वारीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात शिक्षणाचा जागर होतो आहे, ही अभिमानाची बाब असल्याचेही भापकर म्हणाले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षणाची उपयोगिता, नवोपक्रमावर चर्चा, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न वारीच्या माध्यमातून राहील, असेही भापकर म्हणाले.या उपक्रमात विविध विषय, घटक, संकल्पना यावर काम करणाºया संस्था, शाळा, शिक्षक, व्यक्तींचे विविध ५० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यात एकूण १७६ नवोपक्रमी व उपक्रमशील शिक्षक आपल्या शिक्षणविषयक साहित्य, नवोपक्रम पद्धतीचे सादरीकरण करीत आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कांबळे यांनी केले. प्रवीण लोहाडे व शेख तौसिफ यांनी सूत्रसंचालन केले, तर शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी आभार मानले. तीन दिवसांत या वारीला राज्यभरातील १० हजार शिक्षक भेट देऊन अध्ययन, अध्यापनाच्या विचारांचा, प्रगत तंत्रज्ञानाचा आदान-प्रदानावर चर्चा करून अंगीकार करणार आहेत. या वारीत ३६ जिल्ह्यांतून प्रत्येक दिवशी किमान ३ हजार शिक्षक भेट देतील, असे नियोजन करण्यात आले आहे. वारीच्या यशस्वीतेसाठी रवींद्र वाणी, राकेश साळुंके, प्रियाराणी पाटील, विलास केवट, रमेश ठाकूर, राजेश हिवाळे, अफसाना खान, जयश्री चव्हाण, हुमेरा सिद्दीकी, बी.के. मोठे, राजू फुसे, किसन चंदिले, श्रीराम केदार, व्यंकट कोमटवार, अनिल सकदेव, अरविंद कापसे, इलाहाजोद्दीन फारोकी, शेख मोईनोद्दीन, शेख शहानूर, जाकीर शेख, मिर्झा सलीमबेग, राजेंद्र शेळके, गणेश शेळके आदींसह विविध समित्यांचे सदस्य परिश्रम घेत आहेत.मंत्र्यांना सांगितली धामणगावच्या मुलींची व्यथाउद्घाटनप्रसंगी शिक्षणमंत्री तावडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षकांसोबत संवाद साधत होते. त्यावेळी फुलंब्री तालुक्यातील धामणगावच्या उर्दू शिक्षिका शेख सादिया अल्ताफ यांनी आपल्या शाळेत शिकणाºया मुलींची व्यथा थेट शिक्षणाधिकारी तावडे यांना सांगितली. त्या म्हणाल्या, माझी शाळा आठवीपर्यंतच आहे. त्यामुळे आठवीनंतर पालक आपल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी सुरक्षेच्या कारणास्तव दुसºया गावाला पाठविण्यास धजत नाहीत. ते अल्पवयातच आपल्या मुलींची लग्ने उरकून टाकतात.यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तर पालक पुढील शिक्षणाची सोय नाही मग लग्न करून दिलेले बरे, असे उत्तर देतात. अल्पवयात मुलींची होणारी लग्ने थांबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धामणगावात दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी सदरील शिक्षिकीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. त्यावर तावडे यांनी येत्या पंधरा दिवसांत योग्य ती कार्यवाही करून या शाळेचे वर्ग दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
औरंगाबादेत उर्दू शिक्षणाच्या वारीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:08 AM
शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या वारीला औरंगाबादेत शनिवारपासून सुरुवात झाली. शिक्षणाच्या वारीला राज्यभरातील हजारो उर्दू शिक्षकांनी हजेरी लावली.
ठळक मुद्देउर्दू ई-साहित्य अॅपचे विमोचन : ५० स्टॉल्समध्ये नवोपक्रम; उर्दूच्या संवर्धनासाठी प्रयत्न -तावडे