औरंगाबाद : रासायनिक खतांची भाववाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने यावर्षी खतांची प्रचंड भाववाढ केली असून, ती निषेधार्ह आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमालाला योग्य भाव नाही. अवकाळी पाऊस, पेट्रोल-डिझेलची प्रचंड दरवाढ यामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीस आला आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी लक्ष वेधले.
केंद्र सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा निषेध म्हणून कोरोनाचे नियम पाळून निदर्शने करण्याची वेळ आली, असे ते म्हणाले. यावेळी कैलास पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, ज्येष्ठ कार्यकर्ते जयमलसिंग रंधवा, शरद पवार, विशाल शेळके, मयूर अंधारे, प्रवीण म्हस्के आदींनी सहभाग घेतला.