बाबूराव चव्हाण , उस्मानाबादमागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र पुरेसा निधीच मिळत नसल्यामुळे बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला खीळ बसत आहे. असे असले तरी दुसरीकडे प्रशासन मात्र ‘सारे अलबेल’ असल्याचे कागदी घोडे नाचवित आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांसाठी १० हजार गेट बसविण्याची आवश्यकता आहे. सिंचनाखालील क्षेत्र वाढावे, यासाठी मागील काही दशकात जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न झाले. त्यानुसार जिल्ह्यात थोडेथोडके नव्हे तब्बल ९७३ बंधारे उभारण्यात आले. मात्र, त्यानंतर बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. सध्या जिल्ह्यातील बंधाऱ्यांची स्थिती पाहिली असता अनेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले आहेत. अनेक बंधारे मोडकळीस आलेले आहेत. या बंधाऱ्यांची दुरूस्ती मात्र होत नाही. जिल्ह्यात सध्या ९७३ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी १० हजार ५८७ गेटची गरज आहे. या बंधाऱ्यांवर बसविण्यात आलेल्या एकूण ३९ हजार १३८ गेटपैकी २८ हजार ५४५ गेट पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत. दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यात उस्मानाबादचे नाव आघाडीवर आहे. जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या माध्यमातून ८३,५७५ दसलक्ष घनफुट एवढे पाणी अडविणे शक्य आहे. मात्र, ५२ बंधाऱ्यांना गेटच नाहीत, तर १२५ बंधारे मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे पावसाचे सारे पाणी वाहून गेले आहे. शासनाने जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती व गेट बसविण्यासाठी पुरेसा निधी दिला तर शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करणे सहज शक्य होईल.
दुरुस्तीला खीळ
By admin | Published: January 16, 2015 1:06 AM