लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी परवड सुरू असून ५ हजार ४५७ लाभार्थी असलेल्या या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने निराधारांना आधारच नसल्याचे चित्र आहे. निराधारांची अनुदानाची रक्कम आयसीआयसी बँकेच्या वतीने गावोगाव वाटप करते; पण लाभार्थ्यांना धरसोड पद्धतीने होणाºया वाटपाने लाभार्थी वंचित राहत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आईवडिलांचे छत्र हरवलेल्या दोन भगिनी गेल्या अकरा महिन्यांपासून वंचित आहेत.किनवट तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १ हजार ९६१ श्रावणबाळ योजनेचे १ हजार ९४५ व इंदिरा गांधी निराधार योजनेचे १ हजार ५५१ असे एकूण ५ हजार ४५७ लाभार्थी आहे. १९१ गांवे १०५ वाडी-तांड्यातील बहुतांश लाभार्थ्यांना त्यांचे ठरवून दिलेले अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनुदानाच्या प्रतीक्षेतच लाभार्थ्यांना राहावे लागत आहे. आयसीआयसी बँकेच्या सी.एस.पी. मार्फत गावोगाव लाभार्थ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे. मात्र बायोमेट्रीकवर अंगठे येत नाहीत म्हणून लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतात नव्हे वेळेवर अनुदान मिळतच नसल्याने कोणाचाच आधार नसलेल्या निराधारांना अनुदान मंजूर असून मिळत नसल्याने उपासमारीचा सामना करावा लागत आहे.आईवडिलाचे छत्र हरवलेल्या व नातेवाईकांनी झिडकारलेल्या नेहा गणेश सिरपुले व निकिता गणेश सिरपुले या दोघी बहिणींचीही आता उपासमार होऊ लागली आहे. आजीकडे राहत मोलमजुरी करीत शिक्षण घेणाºया नेहाने वर्षभरापूर्वी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून आपली व्यथा मांडली होती. या पत्रानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी किनवटला भेट देऊन तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, तहसीलदार महमद अजीमोद्दीन यांच्या मदतीने निराधार मुलीचा शोध घेतला आणि तातडीने मदत करण्याचे सुचविले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेत या बहिणींचे नाव घेतले. तीन महिन्यांचे मानधन त्यांना मिळालेही मात्र गेल्या अकरा महिन्यांपासून मानधनच न मिळाल्याने त्यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत नायब तहसीलदार हराळे यांचा विचारले असता आॅक्टोबर २०१७ पासून नेहा व निकिताचे मानधनाचे पैसे पाठविले असून बँक खाते उघडण्याची अडचण आहे. किनवट येथे आयसीआयसी बँकेची शाखा नाही. वाटप मात्र सी.एस.पी. मार्फत होणारे निराधारांचे अनुदान वाटप लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर मिळत नाही. बायोमेट्रीकवर अंगठे येत नाहीत म्हणून मोठी समस्या उद्भवते. निराधारांचे अनुदान पूर्ववत स्थानिक बँकेमार्फतच करावे, अशी मागणी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी केली आहे.
अनुदानाअभावी लाभार्थ्यांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:49 AM