--
औरंगाबाद ः जिल्ह्यात १३ हजार ७९९ गरोदर, स्तनदा मातांची नोंदणी आरोग्य विभागाकडे आहे. मात्र, त्यातील कोरोना प्रतिबंधक लस फक्त १५५ महिलांनीच घेतली. हे प्रमाण केवळ १.२० टक्के आहे. अद्याप ४ हजार ३१६ शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. लस मुबलक उपलब्ध असताना लाभार्थींनी तिकडे पाठ फिरवली. लसीकरणाला आवश्यक प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य विभागही हतबल आहे.
फ्रंटलाइन वर्कर शिक्षकांचे ५ सप्टेंबरपूर्वी १०० टक्के लसीकरण करून घेण्याच्या सूचना होत्या. मात्र, अद्याप प्राथमिक शाळेतील ३४६५, माध्यमिक शाळांतील १०९, तर उच्च माध्यमिक शाळांतील ७४२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांत शिक्षकांच्या लसीकरणात सर्वाधिक मागे औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तरीही वारंवार सूचना देऊनही शिक्षक लसीकरणाला पुढे येत नसल्याचे चित्र असल्याने शिक्षण आणि आरोग्य विभागानेही हात टेकले आहेत. तर जनजागृतीअभावी गरोदर आणि स्तनदा मातांतून अत्यल्प प्रतिसाद लसीकरणाला मिळत असताना इच्छुकांचा दुसरा डोस ८४ दिवसाच्या फेऱ्यात अडकला आहे.
----
जनजागृती, पाठपुरावा करू
--
१७ जुलैपासून गर्भवती, स्तनदा माता ज्यांची आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविकांमार्फत नोंदणी केल्या गेली. त्यानंतर लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, अजूनही गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. काहीअंशी आरोग्य विभागही जनजागृती, पाठपुराव्यात मागे पडला असून गरोदर मातांच्या लसीकरणाला गती देण्यात येईल.
-डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, औरंगाबाद