हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर व परिसरातील काही गावांमध्ये बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. वैद्यकीय शिक्षण न घेता गावागावात फिरून रुग्णांना सेवा देणारे बंगाली डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे.
कन्नड तालुक्यातील बहुतांश गावात बोगस डॉक्टरांचा वावर वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय शिक्षण न घेता गावागावात कुठेतरी छोट्याश्या रूममध्ये दवाखाना थाटून रुग्णांची तपासणी केली जाते. अंदाजपंची कमी किमतीत औषधोपचार दिले जाते. परिणामी गोरगरीब जनता या बंगाली डॉक्टरांच्या जाळ्यात अडकली जाते.
आरोग्य विभागाकडून मुन्नाबाई डॉक्टरांची शोधमोहीम थंडावली आहे. कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने गावोगावी बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळू लागले आहेत. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रुग्णांवर औषधोपचार करू लागले आहेत. रुग्णांच्या आजाराचे निदान न करता त्यांच्याकडील औषधी देऊन रुग्णावर एक प्रकारे प्रयोग केले जातात. परिणामी काही रुग्णांचा मृत्यूदेखील होतो.
----
कारवाईची कुणकुण, होतात गायब
आरोग्य पथकाकडून खासगी दवाखान्यांची तपासणी होणार किंवा आरोग्य पथक तपासणीसाठी आले अशी माहिती मिळताच मिळताच बंगाली डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून महिनोमहिने फरार राहतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कधीमधी होणाऱ्या कारवाईतून ते सुटतात.
---
हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या पासून दोन वेळेस कारवाईस गेलो. मात्र त्या ठिकाणी बोगस डॉक्टर मिळून आले नाही. येत्या काळात आरोग्य विभागाचे लक्ष राहील, असे काही आढळून आल्यास कारवाई निश्चित केली जाईल. - डॉ. हेमंत गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी.
---
गावात कुठल्याही बोगस डॉक्टरला ग्रामपंचायत अभय देणार नाही. असे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करून संबंधितावर कारवाई केली जाईल. - आशाबाई अकोलकर, सरपंच, हतनूर.