लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करणाºया बंगाली कारागिरावर विश्वास ठेवणे शहरातील एका ज्वेलर्सला चांगलेच महागात पडले. दागिने तयार करण्यासाठी कारागिराकडे दिलेले ११ लाख ६८ हजार रुपये किमतीचे शुद्ध सोने घेऊन तो पसार झाला. ही घटना २ आॅगस्ट ते २७ सप्टेंबरदरम्यान सराफ्यात घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.गौतम त्रिलोचन (३५, रा. अंजुदिया दासपूर, पश्चिम मदिनापूर, पश्चिम बंगाल, ह. मु. बारुदगरनाला) असे आरोपीचे नाव आहे. सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, हडकोतील नवजीवन कॉलनी येथील राजेश उत्तमराव बोकड यांचे सराफामध्ये मानसी गोल्ड वर्कशॉप नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. ते शहरातील कारागिरांकडून दागिने तयार करून घेतात. २ आॅगस्ट रोजी त्यांनी दुकानातील ११ लाख ६८ हजार ६२१ रुपये किमतीचे ४०० ग्रॅम शुद्ध सोने आरोपीकडे दागिने तयार करण्यासाठी दिले. त्याला या सोन्यापासून झुमके, पदक, एअररिंग, टॉप्स जोडी आदी दागिने तयार करण्याची आॅर्डर दिली. उमेश दिनकरराव जाधव आणि प्रशांत कल्याणराव कुलथे हे तेथे उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे २० आॅगस्ट रोजी गौतम हा दागिने तयार करून त्यांना त्यांच्या दुकानात नेऊन देणार होता. जवळपास बारा लाख रुपये किमतीचे शुद्ध सोने पाहून आरोपीची नजर फिरली आणि त्याने त्यांचा विश्वासघात करून सोन्यासह पलायन केले. २० आॅगस्ट रोजी दागिने न आल्याने तक्रारदारांनी त्याच्याशी संपर्क साधला असता त्याचा संपर्क झाला नाही. बºयाचदा बंगाली कारागीर पंधरा ते वीस दिवस गावी जातात आणि परत येतात. तसा तोही गावी गेला असेल असे समजून ते त्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र घटनेला एक महिना झाल्यानंतरही तो परत आला नाही आणि त्याचा मोबाइलही बंद असल्याने शेवटी राजेश यांनी २७ सप्टेंबर रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यत तक्रार नोंदविली.
बंगाली कारागीर पावणेबारा लाखांचे सोने घेऊन पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:41 AM