औरंगाबाद : बंद कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट फायद्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमधील तीन भामट्यांनी शहरातील व्यापाऱ्याला तब्बल पन्नास लाखांचा गंडा घातला. एवढेच नव्हे तर रक्कम परत करण्यासाठी दिलेले दोन्ही धनादेश न वटता परत आले. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
बदरे आलम सिद्दीकी शमसूल आलम सिद्दीकी (रा.विक्रमगड, ता. कोलकाता), राजसिंग बलदेवसिंग (रा. गोरखपूर, पश्चिम बंगाल) आणि सय्यद आतीफ (रा. कोलकाता) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-८ येथील रहिवासी सय्यद अजमतउल्ला हुसेनी सय्यद अहेमदउल्ला हुसेनी यांचा फ्रीज विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय आहे. दीड वर्षापूर्वी त्यांचा मित्र अंकीत घोष यांनी बदरे आलम, राजसिंग आणि आतीफ यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेच्या वेळी बदरे आणि राजसिंग यांनी त्यांची पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील डोमजूर औद्योगिक वसाहतीत कंपनी आहे. ती कंपनी पैशांअभावी बंद पडलेली आहे. या कंपनीत पैसे गुंतविल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होईल, असे सांगून त्यांनी हुसेनी यांना कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले.
हुसेनी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बदरे आलम आणि राजसिंग यांनी त्यांना कोलकाता येथे नेले. तेथील डोमजूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कंपनी दाखविली. कंपनीकडे भरपूर आॅर्डर आहे. मात्र गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. शिवाय त्यांच्या आलिशान कार्यालयातही नेले. हुसेनी यांना त्यांनी एक ते दोन महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याची हमी दिल्याने त्यांनी पैसे गुंतविण्याची तयारी दर्शविली आणि पैसे घेण्यासाठी औरंगाबादला बोलावले. बदरे याला १५ लाख ५० हजार आरटीजीएसद्वारे आणि २० लाख रुपये रोखीने दिले. आरोपी राजसिंग याच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे १३ लाख २ हजार रुपये हस्तांतरित केले. सय्यद आतीफ यास १ लाख ४८ हजार रुपये रोखीने दिले. ही सर्व ५० लाखांची रक्कम ११ मे ते २ जूनदरम्यान तीन जणांना दिली. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल गोकुळ वाघ यांनी मंगळवारी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी तपास करीत आहेत.
धनादेश दिला आणि अनादरितही केलाबदरे याने हुसेनी यांच्याकडून रक्कम घेताना त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी १५ जून २०१७ रोजीचा ३५ लाखांचा धनादेश हुसेनी यांना दिला. हा धनादेश हुसेनी यांनी बँकेत वटण्यासाठी टाकला असता खात्यात पैसे नसल्यामुळे न वटता परत आला. यामुळे हुसेनी यांनी त्यांच्याशी संपर्क साधून याविषयी विचारले असता त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून सध्या धनादेश टाकू नका, पैसे जमा होण्यास वेळ लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर हुसेनी हे कोलकाता येथे गेले असता २४ जुलै रोजी त्यांनी ३६ लाख ६ हजार ३४५ रुपयांचा दुसरा धनादेश दिला. रोख पैसे नेणे धोकादायक आहे, यामुळे तुम्ही हा धनादेश आणि आधीचा ३५ लाखांचा धनादेश बँकेत जमा करा. तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, असा विश्वास त्यांनी दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून हुसेनी हे औरंगाबादेत परतले आणि त्यांनी दोन्ही धनादेश बँकेत जमा केले तेव्हा ते न वटता परत आले. शिवाय बदरेने दिलेला ३५ लाख ६ हजार ३४५ रुपयांचा धनादेश त्यांच्या मित्राच्या बँक खात्याचा असून, तो त्यांनी चोरून त्यांना दिल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हुसेनी यांनी याविषयी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज नोंदविला.