छत्रपती संभाजीनगर : सेक्रेटरी फर्ममध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या हरिओम किशन खरात (रा. मोंढा नाका) याने मालकाच्या पैशांमध्ये तब्बल ४४ लाखांचा घोटाळा केला. कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्याने ७ लाख रक्कम परत केली. मात्र, नंतर प्रतिसाद देणे बंद केल्याने त्याच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोहर रामराव कुलकर्णी यांची प्रॅक्टिसिंग कंपनीत सेक्रेटरी नावाची फर्म आहे. २०१८ मध्ये खरात याने त्यांच्याकडे काम सुरू केले. परंतु त्या दरम्यान कुलकर्णी आजारी पडले. आजारपणात त्यांना नीट चालता येत नसल्याने त्यांचे कार्यालयात जाणे देखील बंद होते. त्या काळात खरात याने सर्व व्यवहार पाहणे सुरू केले. परंतु कुलकर्णी यांचा मोबाईलच मिळाल्याने त्याने बँकेत नोंद केलेला मोबाईल क्रमांक परस्पर बदलून ओटीपीद्वारे स्वत:चा मोबाईल क्रमांक नोंदवला. शिवाय, त्यांच्या मोबाईलमध्ये मोबाईलचा ताबा घेणारे एनी डेस्क ॲप इंस्टॉल करून सर्व ताबा घेतला. याद्वारे त्याने स्वत:च्या बँक खात्यात २२ लाख ८६ हजार २४१ हजार रुपये रक्कम परस्पर वळती केली.
कुलकर्णी यांनी त्याला मोठ्या विश्वासाने बीड बायपास येथील प्लॉट विक्रीतून आलेले १५ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले होते. ती रक्कम देखील त्याने स्वत:च हडप करून घेतली. एप्रिल, २०२३ मध्ये कुलकर्णी यांनी बँक खाते तपासले असता त्यात पैसेच आढळून आले नाही. असे एकूण खरात याने ३७ लाख ८६ हजार २४१ रुपये वळते केले. गुन्ह्याचा इशारा दिल्यानंतर त्याने भावाच्या मदतीने ७ लाख परतही केले.
दुसरा कारनामा उघडकीस३० लाख ८६ हजारांची रक्कम देणे बाकी असतानाच खरातचा दुसरा कारनामा उघडकीस आला. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सला देणे असलेली १ लाख ९२ हजार रुपये देखील त्याने परस्पर लंपास केले. ती रक्कम न भरल्याने कुलकर्णी यांच्या फर्मला ११ लाख २३ हजारांचा दंड लागला. आपली दिशाभूल होत असल्याचे समजल्यावर कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलिसांकडे तक्रार केल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक वसंत शेळके यांनी सांगितले.