सिल्लोड (औरंगाबाद) : शहरातील एका परमिटरूम बारमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगच्या जमैका तल्लावाह विरुद्ध सेंट किट्स एंड नेविस पैट्रियट्स यांच्यातील सामन्यावर मोबाइलद्वारे पैशांचा सट्टा लावणाऱ्या तिघांवर सिल्लोड शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. १५) दुपारी ३ वाजता छापा टाकला. यावेळी २७ हजार रुपये व जुगाराचे साहित्य असा ६१ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून आयोजित करण्यात आलेली ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेतील सामन्यांवर सट्टा लावून पैशांचा व्यवहार केला जात असल्याची माहिती सिल्लोड शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील औरंगाबाद नाका भागातील एका परमिटरूम बारवर पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, पोलीस नाईक दगडू तडवी, पोलीस नाईक आर. एस. पायघन, पोलीस नाईक के. एम. सोनवणे यांच्या पथकाने १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता छापा टाकला. यावेळी सेंट किट्स एंड नेविस पैट्रियट्स विरुद्ध जमैका तल्लावाह या संघात सुरू असलेल्या सामन्यावर फारुखा गौसखा पठाण (३४, रा. भारतनगर, सिल्लोड), शेख करीम इब्राहिम (३२) व शेख सोहेल हरून (३२, दोघेही रा. स्नेहनगर, सिल्लोड) हे सट्टा लावत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख २६ हजार ९२० रुपये व ३५ हजारांचे जुगार साहित्य, असा एकूण ६१ हजार ९२० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कोट्यवधी रुपयांचा जुगारसिल्लोड शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एशिया कप ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजांनी सट्टा लावला होता. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. लवकरच ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा वर्ल्ड कप होणार आहे. यावरही सट्टा लावला जाण्याची शक्यता आहे. सट्टबाज अज्ञात ठिकाणी बसून सट्टा लावतात. त्यामुळे त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.