छत्रपती संभाजीनगर : साेशल मिडियात पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ८० युवकांना कारागृहाची वारी ग्रामीण पोलिसांनी घडवली आहे. त्या युवकांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात १३ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यामुळे कोणीही सोशल मिडियात अफवा पसरविणाऱ्या पोस्ट करू नयेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले.
शहराच्या नामांतरानंतर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मिडियात टाकण्याचा प्रयत्न अनेकजण करीत होते. त्यामुळे अधीक्षक कलवानिया यांनी धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस, व्हिडिओ क्लिप, अक्षेपार्ह मजूकर, एसएमएस तयार करून पसरविणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश दिले हाेते. त्यासाठी मोहीमच राबविण्यात आली. त्यानुसार १ जानेवारी ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीत एकुण ८० व्यक्तींच्या विरोधात १३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये खुलताबाद, सिल्लोड ग्रामीण, वैजापुर, पिशोर पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन तर पाचोड, बिडकीन, कन्नड शहर, फुलंब्री, गंगापुर पोलिस ठाण्यात प्रत्येक एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोशल मिडियात पेट्रोलिंगग्रामीण पोलिसांच्या सायबर टीमने तंत्रज्ञानाचा वापर करीत पोलिसांच्या सहकार्याने मागील काही दिवसांपासून सोशल मिडियात पेट्रोलिंग सुरू केली आहे. अक्षेपार्ह पोस्ट कोणी केल्यानंतर त्याची खात्री करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी साबयर पोलिस २४ तास अलर्ट असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली.
आरोपींमध्ये युवकांचा समावेशपोलिसांनी सोशल मिडियात अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल जे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये १९ ते ३० वयोगटातील ८० युवकांचा समावेश आहे. गुन्हा नोंदविल्यामुळे संबंधित युवकांचे शैक्षणिक आयुष्य उद्धवस्थ होत आहे. त्यामुळे कोणीही सोशल मिडियात समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट करू नये, असे आवाहनच ग्रामीण पोलिसांनी केले आहे.