औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. प्राणिसंग्रहालयातील तब्बल २५० पेक्षा अधिक प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न देण्यात येते. ज्या कंत्राटदाराकडून अन्न खरेदी करण्यात येते त्याचे वजन करण्यात येते. आयुक्त थेट वजनकाट्यावर जाऊन उभे राहिले. आयुक्तांचे वजन ८५ किलो असताना वजनकाटा चक्क८९ किलो दाखवत होता. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर सांगितले की, प्राण्यांचे अन्न खाल तर माझ्यासारखा वाईट कोणी राहणार नाही. माणुसकी शिल्लक असेल, असा प्रकार अजिबात करू नका, असा इशारा त्यांनी दिला.
मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी मागील आठ दिवसांपासून विविध कामांचा धडाका लावला आहे. सोमवारी सकाळी आयुक्त एखाद्या वॉर्डात जातील पाहणी करतील, असे सर्वांना वाटत होते. त्यांनी आज कोणत्याही वॉर्डात पाहणी केली नाही. प्राणिसंग्रहालयातील पाचवर्षीय मगर मरण पावल्याचे त्यांना कळाले. आयुक्त पाण्डेय थेट प्राणिसंग्रहालयात दाखल झाले. ऐनवेळी त्यांचे आगमन झाल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली होती. आयुक्तांनी समृद्धी या वाघिणीच्या चारही बछड्यांची पाहणी केली. सर्पालयातील विविध सापही बघितले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट प्राण्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या वजनकाट्याकडे वळविला. अधिकाऱ्यांसमक्ष ते थेट वजनकाट्यावरच जाऊन उभे राहिले.
चार किलो वजन जास्त असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. प्राण्यांचे अन्न खाल तर माझ्यासारखा कोणी वाईट राहणार नाही. तक्रार आली तर मी सोडणार नाही. आयुक्तांचे हे शब्द ऐकून अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटला होता. आयुक्तांना काय उत्तर द्यावे हेच सूचत नव्हते. वजनकाट्यात पाणी गेल्याने ते चार किलो वजन जास्त दाखवत असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला. आयुक्तांना हा खुलासा अजिबात पटला नाही. आयुक्तांच्या पाहणीप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले यांचीही उपस्थिती होती.