छत्रपती संभाजीनगर : गहू, तूर आणि उडीद डाळ या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याचे निदर्शनास येताच केंद्र सरकारने या वस्तूंच्या साठेबाजीवर निर्बंध घातले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने साठेबाजीवर निर्बंध घालणारे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी केले. या आदेशानुसार डाळ मिल, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांच्यावर साठा मर्यादा घातली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात गहू, तूर आणि उडीद या डाळींचे दर सतत वाढत आहेत. बाजारात गहू ३० रुपये ते ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे, तर तूर आणि उडीद डाळीचे दरही वाढले आहेत.
याबाबतचे निर्देश केंद्र सरकारकडून येताच जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी मंगळवारी आदेश जारी केले. शासनाच्या नियमानुसार आता घाऊक व्यापारी तूर आणि उडीद डाळी २०० मे. टनांपर्यंत साठा करू शकतात. किरकोळ व्यापारी ५ मे. टन, बिगचेन रिटेलसाठी ५ मे. टन, डाळ डेपो परवानाधारक २०० मे. टन, तसेच डाळ मिल चालक हे गत तीन महिन्यांच्या उत्पादन क्षमतेच्या २५ टक्के आणि आयातदारांकरिता आयात दिनांकापासून ३० दिवसांचा साठा चालेल. साठ्याची माहिती केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नोंदवून दर शुक्रवारी तूर, उडीद डाळीच्या साठ्याची माहिती अद्ययावत करावी लागेल.
...अन्यथा माल जप्तघाऊक व्यापारी ३ हजार टन, किरकोळ व्यापारी प्रत्येक आउटलेटसाठी १० टन, बिग चेन रिटेलर्ससाठी १० टन व डेपोसाठी ३ हजार टन, प्रोसेसर्सकरिता वार्षिक क्षमतेच्या ७५ टक्के किंवा मासिक स्थापित क्षमतेच्या विशिष्ट पट साठा करता येईल. यापेक्षा अधिक साठा असेल तर एक महिन्याच्या आत या साठा बाजारात विकावा लागेल. अन्यथा अशा व्यापाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवून हा माल जप्त केला जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली.