वाळूज महागनर : घरात अन्नधान्य व इतर साहित्याचे नुकसान करणाऱ्या उंदराला घरातील नागरिक वैतागलेले असतात, त्याला रॅटपॅड, गमपॅडचा ट्रॅप लावला जातो. त्यावर चिकटलेल्या उदरांना नंतर घराबाहेर फेकून दिले जाते. परंतु, याच रॅटपॅडवर, गमपॅडवर खारूताई आणि सरपटणारे प्राणी चिकटून तडफडून मृत होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या गमपॅडवर बंदी आली असली तरी त्याची सर्रासपणे दुकानावर विक्री सुरू आहे. यामुळेच उंदरांसह इतर सरपटणारे प्राणी, किडेदेखील चिकटून तडफडून मरू लागले आहेत.
वाळूज एमआयडीसी कंपन्यांमध्ये उंदरांसाठी ठेवण्यात आलेला गमपॅडवर खारूताई, सरडे, पाली चिकटून मरू लागले आहेत. अन्नाच्या शोधात फिरत असताना हे सरपटणारे प्राणी पॅडला चिकटतात व त्यांना गम पॅडवरून काढणे कठीण झाले आहे. यामुळे मात्र इकोसिस्टमला बाधा पोहोचत असून याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा ‘लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.
नेमके झाले काय?वाळूज औद्योगिक क्षेत्रात ६ डिसेंबरला ‘लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन’ चे सभासद दाऊद शेख यांना एक कॉल आला. यावेळी आलेला कॉल वेगळा होता. गमपॅडला दोन खारूताई चिकटल्या असून त्या तडफडत असलेला तो कॉल होता. ते तिथे गेले. गमपॅडवरून दोन्ही खारूतााईंना मोठ्या प्रयासाने काढले, पण त्यांच्या पोटाच्या त्वचेला गंभीर जखमा झाल्या होत्या. औषधपाणी देऊन त्यांना झाडावर सोडण्यात आले.
सामान्य जनतेने विचार करावा...उंदरांच्या त्रासातून सुटका करण्यासाठी पिंजरा तसेच गोळ्या, रॅट किलर केक यांचा उपयोग केला जातो. तो इतर प्राण्याला व लहान मुलांना घातक ठरू नये याकडे लक्ष द्यावे.- जयेश शिंदे, सचिव लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्था
वापर टाळावाच....शहर तसेच औद्योगिक क्षेत्रात अनेकदा सापाला या पॅडवरून सुरक्षित काढण्यात आले, तर बहुतेक वेळेस ते चिकटून तफडून मेल्याच्याही घटना वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यात आलेली आहे पण सर्रास विक्री सुरूच आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.- सर्पमित्र मनोज गायकवाड
कंपन्यांना सूचना दिल्या...गमपॅडचे उत्पादन थांबवावे, यासाठी कंपन्यांना भारतीय प्राणी कल्याण मंडळाने त्याच्या उत्पादनासह वापरावर बंदी घालावी असे परिपत्रक २०२० मध्ये निर्गमित केलेले आहे. सर्व कार्यक्षेत्रातील औषध निरीक्षकांना योग्य ती कारवाईसाठी निर्देश द्यावेत, असे सुचविले आहे.- गिरीष हुकारे, सह आयुक्त (औषधे)