छत्रपती संभाजीनगर : हल्ली मोबाइल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष कोरोना प्रादुर्भाव काळात आणि त्यानंतर लहान मुलांमध्येही मोबाइलचा स्क्रिन टाइम वाढला आहे. परिणामी, डोळ्यांचे आरोग्य बिघडत आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे दूरच्या दृष्टीवर परिणाम होतो. त्यातूनच दूरचा नंबर लागण्यास हातभार लागत असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ. अभिजित गोरे यांनी सांगितले
मोबाइलमुळे नेत्रदोष निर्माण होतो का?मोबाइलचा स्क्रिन टाइम वाढल्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो. लहान मुलांचे वाढते वय असते. या वयात मोबाइलच्या अधिक वापरामुळे चष्मा लागतो, तर मोठ्या व्यक्तींमध्ये डोळे कोरडे पडणे, लाल होणे, कचकच होणे, थकवा जाणवणे आदी त्रास होतो.
कोणकोणत्या कारणांनी नेत्रदोष उद्भवतात?सतत मोबाइल, लॅपटाॅपच्या स्क्रिनकडे पाहणे, रात्रीचे जागरण, प्रदूषण, ताणतणाव, सकस आहाराअभावी जीवनसत्त्वाचा अभाव, आनुवंशिकता आदी कारणांमुळे नेत्रदोष उद्भवतात.
कोणत्या वयोगटात नेत्ररोग अधिक आहेत ?सामान्यत: १८ ते ४५ वर्षे या वयोगटात नेत्ररोगाची अधिक कारणे आहेत. तरुणांमध्ये रिल्स पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातून डोळे लाल होणे, डोळे कोरडे होणे असा त्रास होतो.
डोळ्यांची कशी काळजी घ्यावी?मोबाइलचा अतिवापर करू नये. अनावश्यक स्क्रिनचा वापर टाळावा. संगणकावर काम करणाऱ्यांनी दर अर्धा तासाला किमान एक मिनीट डोळे बंद करावे. सकस आहार घ्यावा. रात्रीचे जागरण टाळावे. लहान मुलांचे मैदानात खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मैदानी खेळ खेळल्यामुळे दूरची दृष्टी चांगली राहते. डोळ्यांना काही त्रास जाणवल्यास वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.