औरंगाबाद: वर्क फ्रॉम होम करा आणि घरबसल्या बक्कळ कमाई करण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने सहायक पोलीस निरीक्षकाच्या मुलाकडून तब्बल १ लाख ५९ हजार ९९७ रुपये ऑनलाईन उकळल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम मुलाने पोलीस अधिकारी असलेल्या वडिलाच्या बँक खात्यातून परस्पर अदा केल्याचे तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. (The son of a police officer was cheated of Rs 1.5 lakh by cyber criminals )
या गुन्ह्याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस दलात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बोंडेकर (रा. एन ८, सिडको) यांचा दहावीत शिकणारा मुलगा वेदांतने ट्विटर या समाजमाध्यमावर वर्क फ्रॉम होमची जाहिरात वाचली. यानंतर त्यांने जाहिरातीतदाराशी संपर्क केला असता त्याने सांगितले की, कंपनीकडून तुम्हाला एक लिंक पाठविली जाईल, या लिंकनुसार घरबसल्या ऑनलाइन काम केल्यास तुम्हाला १२्० ते १५० रुपये मिळतील. तुम्हाला सर्व्हरला जॉईन होण्यासाठी ९९९ रुपये भरावे लागतील असे सांगून त्याने अमित रॉय याचा बँक खात्याचा क्रमांक दिला. वेदांतने वडिलांच्या परस्पर त्याच्या मोबाईलमधील पेटीएएमद्वारे ही ९९९ रुपये पाठविले.
यानंतर त्यांच्या व्हॉटस्ॲप वर त्यांना आलेल्या मेसेजमध्ये तुमचे रजिस्ट्रेशन झाले असून सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून ४९९९ रुपये भरायला लावले. पॅकेज खरेदी करावे लागेल असे सांगून त्यांना १७ जून रोजी ८९९९ रुपये पाठविण्यास सांगितले. वेदांतने ही रक्कम पाठविली. दुसर्या दिवशी ॲपवर लिंक तयार करण्यासाठी २५ हजार रुपये आणि १९ जून रोजी रिफंड कार्ड खरेदीसाठी ४० हजार रुपये अंशुदास नावाच्या खातेदाराच्या बँक खात्यात पाठविले. २० जून पर्यंत वर्क फ्रॉम होमची लिंक उपलब्ध न झाल्याने वेदांतने त्यांच्याशी संपर्क केला असता आरोपींनी तुम्ही भरलेली रक्कम तुम्हाला परत मिळेल मात्र याकरीता एक दोन दिवसाचा कालावधी लागेल अशी थाप मारली.
२१ जून रोजी सर्व प्रक्रीया करण्यास उशीर झाल्यामुळे लिंक फेल झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. तुम्हाला पुन्हा नव्याने प्रोसेस करावी लागेल असे सांगून २२ जून रोजी तक्रारदार यांच्याकडून ८० हजार रुपये ऑनलाइन घेतले. अशाप्रकारे एकूण १ लाख ५९ हजार ९९७ रुपये ऑनलाईन उकळल्यानंतरही आरोपींनी तक्रारदार यांना वर्क फ्रॉम होमनुसार काम दिले नाही, एवढेच नव्हे तर त्यांना त्यांची रक्कम परत केली नाही. आपली फसवणुक झाल्याचे वेदांतने आई-वडिलांना सांगितले. यानंतर वेदांतची आईने सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.