औरंगाबाद : वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा धोक्यात आला आहे. यापुर्वी जागतिक वारसास्थळांच्या यादीतून ३ वारसास्थळे काढण्यात आली आहेत. तर भारतातील नैसर्गिक वारसास्थळ असलेले मानस सरोवर आणि सांस्कृतिक वारसास्थळ असलेले हंपी सध्या डेंजर झोनमध्ये आहे. अपंगांची आर्थीक लुट, पाकीटमारी, चोऱ्या, थेट लेण्यात विक्रेत्यांचा प्रवेश याबाबत पर्यटकांच्या तक्रारी वाढत असल्याने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक डाॅ. मिलनकुमार चावले म्हणाले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमीत्त एमजीएममध्ये आर्यभट्ट सभागृहात शुक्रवारी आयोजित पुरातत्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. एमजीएम विद्यापीठ, अमेसिंग औरंगाबाद, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे आयोजित या कार्यक्रमास विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, डॉ. एच. एम. देसरडा, नीलेश राऊत, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी डाॅ. मिलनकुमार चावले म्हणाले, जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा हा कायमस्वरूपी नसतो. तो टिकवावा लागतो. वेरूळ लेणीत स्थानिक विक्रेते आतमध्ये प्रवेश करून विक्री करत आहेत. तो पुरातत्व कायद्यानुसार गुन्हा असुन त्यावर आम्ही त्यावर कारवाई करूण्यास असमर्थ ठरतो. याविषय पोलीस अधिक्षकांशी वैय्यक्तीक चर्चा केली असता त्यांनी गुन्हा घडल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे स्पष्ठ केले. जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाई केली पाहिजे परंतू तसे घडत नाही.
अजिंठा लेणीत चित्र नैसर्गिक रंगानी बनवलेली आहेत. पाच ते दहा हजार पर्यटक तिथे दिवसाकाठी भेटी देतात. त्यांच्या श्वाच्छोश्वासाने आर्दता तयार होऊन सिल्व्हर फिश (किटक) त्यात उत्पत्ती होऊन ऐतिहासिक चित्रांना हानी पोहचत आहे. पर्यटकांच्या गर्दीवरील नियंत्रणासाठी राज्य शासनाला आम्ही तेथील इंटरप्रिटेशन सेंटर मागत असून त्यातील चार लेण्यांच्या रिप्लीकातून पर्यटकांना लेण्या चांगल्या पद्धतीने समजवून घेता येतील. त्यामुळे रंगकाम असलेल्या लेण्यातील गर्दी कमी करता येईल. तसेच पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एकच तिकीट करण्यासंबंधी विचारणा झाली. मात्र, एएसआयच्या तिकीटाची प्रक्रिया किचकट असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. अध्यक्षीय समारोप एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम यांनी केला. प्रास्ताविक आदित्य वाघमारे यांनी केले. तर आभार ॲड. स्वप्नील जोशी यांनी मानले.
पर्यटनस्थळे बघा, तिथे पिक्निक नकोपर्यटनस्थळे, वारसास्थळे संग्रहालय म्हणून बघा, तिथे पिक्निक नको, अस्वच्छता करू नका. पुढच्या पिढीच्या हाती ही वारसास्थळे सुरक्षित सोपवा. स्मारकांच्या ठिकाणी तोडफोड करणे, नावे लिहिने, स्कॅचेस मारणे अशी मानसिकता सोडण्याचे आवाहनही यावेळी मान्यवरांनी उपस्थित तरूणाईला केले.