छत्रपती औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना बुधवार १२ जुलैपासून हवामान खात्याने यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
पाच जिल्ह्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात १४ जुलैपर्यंत तर परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात १२ जुलै या एकाच दिवसासाठी येलो अलर्ट आहे. तर विदर्भात १६ जुलैपर्यंत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यात बुधवारी सकाळपर्यंत ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
पावसाळा सुरू झाल्यापासून आजवरच्या सरासरी तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झाला आहे. १ जून ते १२ जुलैपर्यंत ६६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने या पट्ट्यातील पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे, एवढीच समाधानकारक बाब सध्या आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. २० टक्के पाऊस आजवर झाला आहे. विभागातील ११ मोठ्या धरणांमध्ये ४५.४४ टक्के जलसाठा असून फक्त १ टक्का पाणी गेल्या आठवड्याच्या तुलनेत धरणात वाढले आहे.
येलो अलर्ट म्हणजे काय....हवामान खात्याच्या सूचनेनुसार येलो अलर्ट म्हणजे संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या सूचना हवामान खात्याकडून दिल्या जातात.
मराठवाड्यात ४५० मंडळे...मराठवाड्यातील ८ हजार ५०० गावांतील पर्जन्यमान मोजण्यासाठी ४५० मंडळनिहाय विश्लेषण केले जाते. २० गावांसाठी एक मंडळाचे क्षेत्र असून आजवर ६६ मंडळात अतिवृष्टी झाल्याने १३२० गावांत बऱ्यापैकी पाऊस पडल्याचे दिसते. ३ मंडळात १०० मि.मी.पेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. ७ हजार ६८० गावांमध्ये कमी-अधिक पावसाची नोंद झाली आहे.