- सुनील घोडके खुलताबाद (जि. औरंगाबाद) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने श्रावण महिन्यातील किमान दोन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे भाविकांवर अवलंबून असलेल्या परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
भद्रा मारुती जागृत देवस्थान म्हणून राज्यभरात प्रसिद्ध आहे. चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने व्यावसायिक संकटात असल्याचे व्यावसायिक संदीप औताडे यांनी सांगितले. देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे म्हणाले, ‘‘शेकडो लोक बेरोजगार झाले असून अनेक जण शेतमजुरीसाठी जात असल्याचे म्हटले.’’
जत्रेचे स्वरूपश्रावणातील दर शनिवारी, तर दोन लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.
पाच ट्रक नारळाची आवकहनुमान जयंतीला मोठी यात्रा असते व मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र, यावर्षी तीही झाली नाही. श्रावणातही मंदिर बंद असल्याने देवस्थानची दानपेटी, देणगी असा उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. मंदिर परिसरात श्रावणात जवळपास पाच ट्रक नारळाची आवक होत असते व दीड लाख नारळ मारुतीच्या चरणी फोडले जातात.
भद्रा मारुती मंदिर परिसरात भाविकांवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मंदिर बंद असल्याने गेल्या चार महिन्यांपासून गंडांतर आले आहे. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने यातील अनेक जण मजुरी, शेतमजुरीकडे वळले आहेत, तसेच मंदिर संस्थानलाही उत्पन्न मिळणे बंद झाले. - मिठ्ठू पाटील बारगळ, अध्यक्ष, भद्रा मारुती संस्थान