खुलताबाद : येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी श्रावणाच्या दुसऱ्या शनिवारीही लाखो भाविकांनी गर्दी केली होती. तीन पोते रूद्राक्ष मण्यांनी भद्रा मारुतीच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती.पायी येणाºया भाविकांच्या सोयीसाठी औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी सेवाभावी, सामाजिक संस्थेतर्फे चहापाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविक खुलताबादेत दाखल होत होते. जय भद्राचा जयघोष करीत पालख्या सवाद्य मिरवणुकीने खुलताबाद शहराच्या चोहोबाजूंच्या रस्त्याने येत होत्या. रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. परिसरात फुलहार, नारळ, पेढे व धार्मिक साहित्याची मोठी विक्री झाली.औरंगाबाद येथील जयसुख पटेल हे श्रावण महिन्यात दररोज भद्रा मारूतीचा आकर्षक श्रृंगार करतात. दुसºया शनिवारी औरंगाबाद येथील जयसुख पटेल, निलेश देशमुख, वल्लभ लढ्ढा, प्रकाश पुरवार, संजय काळे यांनी तीन पोते रूद्राक्षच्या मण्यांनी व नागवेलीच्या पानांनी आकर्षक सजावट केली. तसेच मूर्तीच्या बाजूला छान असे तीन शिवलिंग तयार करून सजावट केली.शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने भाविकांची मोठी गर्दी आज वेरूळ येथील घृष्णेश्वर व खुलताबाद मारूती मंदिरात झाली होती. पोलीस निरीक्षक हरीश खेडकर व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून होते. भाविकांना सुरळीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, विश्वस्थ लक्ष्मण फुलारे, लक्ष्मण वरपे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे, कर्मचारी, पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत होते.
तीन पोते रुद्राक्ष मण्यांनी भद्रा मारुतीची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:47 AM