औरंगाबाद : भगतसिंगनगर परिसरातील एका जीममध्ये आंतरधर्मीय जोडपे पाहून परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. जमावाने घोषणाबाजी करत जीमच्या काचा फोडल्या. जोडप्यास जीममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केले. तेव्हा गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पिटाळून लावले.सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे व उपनिरीक्षक गोरख चव्हाण हे फौजफाटा घेऊन भगतसिंगनगर येथे तात्काळ पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम जीममधील तरुण- तरुणीस ताब्यात घेतले. जमावाने घोषणाबाजी करीत दगडफेक करायला सुरुवात केली.भगतसिंगनगरात जमलेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी आंतरधर्मीय जोडप्यास सुरक्षेमध्ये पोलीस आयुक्तालयात नेले. भगतसिंगनगर परिसरातील मारुतीनगरमध्ये त्या तरुणाचे दोन मजली घर आहे. खालच्या मजल्यात तरुणाचे आई- वडील राहतात, तर वरच्या मजल्यावर तो जीम चालवतो. त्याचे व मिल कॉर्नर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत. त्यांनी अलीकडेच बुद्ध लेणी येथे आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेला आहे. आज गुरुवारी दुपारी ते दोघेजण मारुतीनगरमध्ये गेले. तेथे वरच्या मजल्यावरील जीममध्ये जात असताना नागरिकांनी त्यांना पाहिले. आंतरधर्मीय जोडपे पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी तेथे जाऊन जीमची तोडफोड केली. दोघांना जीममध्ये कोंडले व पोलिसांना फोन केला. पोलीस आल्यानंतर त्यांनी संरक्षणात दोघांना आयुक्तालयात नेले. पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तरुण- तरुणीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. दोघेही सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी जवळपास ३ तास वेगवेगळ्या कक्षात तरुण- तरुणीचे म्हणणे ऐकून घेतले. तरुणीच्या आई-वडील-भाऊ-बहिणींनी खूप विनवण्या केल्या; पण ती त्या तरुणासोबतच जाण्यावर ठाम राहिली.
आंतरधर्मीय जोडप्यावरून भगतसिंगनगरात तणाव
By admin | Published: June 13, 2014 1:07 AM