लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी गावा-गावात शासकीय मदत, लोकसहभागातून कामे केली जात आहेत़ ‘पाणीवाले बाबा’ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणा काम करीत आहे़ मात्र, तालुक्यातील कसबे तडवळे शिवारातील मांग नदीपात्राचे तीन किलोमीटर झालेले खोलीकरण-रूंदीकरणाचे काम या कामाहून वेगळे ठरत आहे़ नदी पुनर्जिवित करण्यासाठी देवदत्त मोरे यांनी ‘भगिरथा’ची भूमिका पार पाडत स्वखर्चातून तब्बल तीन किलोमीटरचे खोलीकरण-रूंदीकरणाचे काम केले आहे़ या कामामुळे या भागातील तब्बल चारशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्व असलेल्या कसबे तडवळे गावातील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मागील तीन-चार वर्षात प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत़ दुष्काळी परिस्थितीत चारा-पाण्याच्या टंचाईला तोंड देताना प्रशासनासह सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले होते़ गावावर सतत पडणारा दुष्काळ दूर करण्यासाठी गावचे सुपूत्र उद्योजक देवदत्त मोरे यांनी पुढाकार घेतला आहे़ गावाच्या शेजारून वाहणाऱ्या मांग नदीचे पात्र ९ किलोमीटरचे आहे़ मात्र, नदीपात्रात वाढलेली झाडे-झुडपे आणि गाळ यामुळे पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जात होते़ खोलीकरण-रूंदीकरण कामाचे महत्त्व ओळखून मोरे यांनी या मांग नदीच्या पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण स्वखर्चातून करण्याचा निर्धार केला़ नदीपात्रातील झाडे, झुडपे, काटेरी झाडे तोडून खोलीकरण-रूंदीकरण करण्याचे आव्हान पुढे उभा होते़ मोरे यांनी कोणतीही शासकीय मदत न घेता मागील दोन महिने स्वखर्चातून हे आव्हान पेलले आहे़ आजवर चार किलोमीटरचे काम झाले असून, १० फूट खोल व ३० फूट रूंद नदीपात्राचे काम करण्यात आले़ चार किलोमीटरचा टप्पा स्वखचार्तून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मोरे यांनी ठरविले आहे. गावाच्या दक्षिणेकडील बाजूने नदीला पुनर्जिवित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामावर ५० लाख रूपयांपेक्षा अधिक खर्च त्यांनी केला आहे़ या कामामुळे नदीपात्रात जवळपास ४० टीसीएम इतका पाणीसाठा होणार आहे. परिणामी या भागातील शंभराहून अधिक शेतकऱ्यांच्या विहिरी, कुपनलिकांची पाणीपातळी वाढणार आहे़ तर ४०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ उर्वरित कामही पूर्णत्वाकडे नेण्याचा निर्धार मोरे यांनी केला आहे़
कसबे तडवळ्यातील ‘भगिरथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 12:01 AM