- स.सो.खंडाळकर
डॉ. भागवत कराड यांना खासदारकी देऊन भाजपने विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात एक-दोन नव्हे, तर अनेक पक्षी उडविण्याचे राजकारण केले असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. जुने-जाणते, मुरब्बी राजकारणी एकनाथ खडसे व औरंगाबादच्या विजया रहाटकर यांना डॉ. कराड यांच्या खासदारकीने धक्का न बसल्यास नवल. कारण पूर्वीपासून ही दोन्ही नावे चर्चेत होती. डॉ. कराड यांचे नाव ध्यानीमनी नसताना आले आणि डॉ. कराड यांची खऱ्या अर्थाने लॉटरी लागली.
ओबीसी चेहरा हवा होता ‘मला अचानक बायोडाटा पाठवायला सांगण्यात आले. माझं शिक्षण आणि पक्षाला हवा असलेला ओबीसी चेहरा यातून मला ही खासदारकी मिळाली, अशी डॉ. भागवत कराड यांची प्रतिक्रिया आहे. हे जरी खरे असले तरी त्यांना खासदारकी देण्यामागे बरेच शह-काटशहाचे राजकारण घडलेले दिसून येते. धनंजय मुंडे- पंकजा मुंडे यांचे बीड- परळीतील राजकारण सतत गाजत असते. या पार्श्वभूमीवरही डॉ. कराड यांच्या खासदारकीकडे पाहावे लागणार आहे. ओबीसी- वंजारींचे एक नवे सत्ताकेंद्र भाजपला अपेक्षित दिसते. मुंडे बहीण- भावाला डॉ. कराड यांचा कितपत शह बसतो, ते आता पाहावयाचे. तशी तर डॉ. कराड यांची प्रतिमा पंकजा मुंडे समर्थक अशीच आहे; परंतु पंकजा मुंडे यांचे हात बळकट करण्याऐवजी डॉ. कराड यांनाच खासदारकी दिली जाते, तर हे राजकारण काय असू शकते, हे जाणकारांना समजल्याशिवाय राहणार नाही.
खडसेंचा पत्ता कुणी कट केला? एकनाथ खडसे यांचा पत्ता कुणी कट केला असेल, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे स्पर्धेत क्रमांक १ वर असलेल्या खडसे यांना ऐनवेळी तोंडघशी पडावे लागले. ते खासदार झाले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांची डोकेदुखी वाढली असती. त्यामुळे त्यांचा इथेही पत्ता कट करण्यात आला. विजया रहाटकर भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात चांगली प्रतिमा असलेल्या नेत्या. मागच्या वेळीही त्यांचे नाव चर्चेत होते. यावेळीही होते; परंतु खादारकीने त्यांना हुलकावणी दिली आहे.
गोड पेढ्याची कडू कहाणीडॉ. भागवत कराड यांना खासदारकी मिळाल्याचा आनंद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांना झाला. म्हणून त्यांनी कराड यांना पेढा भरवला. हा पेढा चंद्रकांत खैरे यांना कडू वाटल्याशिवाय राहिला नाही. कारण आदित्य ठाकरे यांची माफी मागण्यासाठी घेतलेल्या पत्रपरिषदेला अंबादास दानवे यांना बोलावण्यात आले नव्हते. स्वत: चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेच्या कोट्यातील खासदारकी हवी होती. ती आदित्य ठाकरे यांच्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांना मिळाली आणि खैरे यांनी संयमी प्रतिक्रिया न देता चिडून प्रतिक्रिया दिली आणि नेहमी वरिष्ठांची व विशेषत: ठाकरे घराण्याची मर्जी सांभाळणाऱ्या खैरेंना बॅकफूटवर जावे लागले. आता डॉ. भागवत कराड खासदार झाल्याने औरंगाबादसह मराठवाड्यात भाजपला फायदा होणार नाही, असे काही म्हणता येणार नाही. औरंगाबादमध्ये भाजपला एक सत्ताकेंद्र मिळाले. हिंदुत्वासाठी खैरेंऐवजी कराड एक चेहरा लाभला. त्याचा फायदा भाजपला होईल.
कोण आहेत भागवत कराड डॉ. कराड हे एक बालरोग शल्यचिकित्सक. निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ओळख. त्यांचे सासरे डॉ. वाय.एस. खेडकर हे काँग्रेसचे राजकारण करीत; पण त्यांना कधी आमदार होऊ दिले गेले नाही. खरंतर डॉ. कराड यांना तशी राजकारणाची गरजच नव्हती. कारण त्यांचा वैद्यकीय पेशा आणि त्यात त्यांचा चांगला जम बसलेला. मात्र, १९९५ च्या मनपा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि राजेंद्र दर्डा यांच्या सहकार्याने निवडून आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ४स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना एकदा नव्हे, तर दोन वेळा या शहराचा महापौर केले. पुढे पंकजा मुंडे यांनाही त्यांनी खंबीर साथ दिली. २०१५ मध्ये ते मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष झाले. या माध्यमातून मराठवाड्याचे विकास प्रश्न ऐरणीवर आणून मोठी चर्चा घडवली. डॉ. कराड हे शांत, संयमी नेते आहेत. गरिबीचे चटके त्यांना बसलेले असल्याने ती जाण त्यांना आहे. उच्चविद्याविभूषित असल्याने राज्यसभेत ते इंग्रजी, हिंदीत बोलून मराठवाड्याला न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.