औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी त्यांच्या मुलाला उभे करून निवडून आणून दाखवावे. ते असे करू शकत नसतील तर त्यांनी राजकारण सोडून द्यावे. मुलाला निवडून आणल्यास मी राजकारण सोडून देईन. माझा भाऊ युतीच्या उमेदवाराच्या विरोधात गुलमंडीवरून अपक्ष निवडून आला होता. अपक्ष नगरसेवकांचा मी गट तयार करून मुलाला स्वीकृत नगरसेवक केले. यामध्ये भाजपची काहीच मदत घेतली नाही. पक्षाने मला जे दिले त्यापेक्षा शंभरपट जास्त मी त्यांना दिले आहे. कराड यांनी अभ्यासपूर्ण बोलावे, असे मत सेनेत स्वृगही परतलेले माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मागील सहा वर्षांमध्ये भाजपने मला खूप काही देऊन मोठे केलेले नाही, उलट मीच पक्षाला मोठे करण्याचे काम केले. २०१५ पूर्वी पक्षाचे फक्त १७ नगरसेवक होते. मी ही संख्या २३ पर्यंत नेली. ११ अपक्षांचा गट तयार करून भाजपच्या पाठीशी उभे करून संख्या ३४ पर्यंत नेली. माझ्यावर सत्तेचा आरोप करणाऱ्या डॉ. कराड यांनी खुल्या प्रवर्गातून किमान मुलाला तरी निवडून आणून दाखवावे, असे खुले आव्हान तनवाणी यांनी दिले. ‘किशचंद तनवाणी म्हणजे सत्तेच्या गुळाला लागलेला मुंगळा’ अशा शब्दांत डॉ. भागवत कराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना टीका केली होती. या टीकेला संतापलेल्या तनवाणी यांनी जोरदार उत्तर दिले. २०१४ मध्ये सेना-भाजपची युती तुटली. मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपकडे उमेदवार नव्हता, म्हणून मला तिकीट दिले होते. यांच्याकडे एवढे सक्षम उमेदवार होते तर का तिकीट दिले नाही. २०१६ मध्ये मला शहराध्यक्ष केले. मागील चार वर्षांमध्ये मी पक्षाला जेवढे मोठे केले तेवढे तर कराड यांनी आयुष्यभरात पक्षाला मोठे केले नाही. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, वैैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, दिल्लीतील एक समिती घेतली. पक्षात योगदान काय तर शून्य. मागील पाच वर्षांत सत्ता असताना भाजपकडून काहीच घेतले नाही. एकनिष्ठ राहूनच काम केले. पक्षशिस्त, गद्दारी ही भाषा मला शिकवू नये, स्वत: कराड आणि पक्षातील नेत्यांनी स्वत:कडे बघावे मग कळेल. लाडगाव जि.प. सर्कलमध्ये पक्षविरोधी कारवाया कोणी केल्या...?
शहराध्यक्ष शहरात कमी, बाहेरच जास्तभाजपने नवनियुक्त शहराध्यक्ष शहरात कमी आणि बाहेरच जास्त असतात. त्यांनीही अभ्यासपूर्ण बोलावे. मी भाजपच्या जिवावर भाऊ, मुलाला निवडून आणले नाही. सध्या पक्षाचे संघटन आयते मिळाले आहे. मनपा निवडणुकीनंतर पक्ष कसा चालवतात, हे कळेल. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निवडीवर पक्षाचे किती नेते नाराज आहेत, हेसुद्धा लवकरच कळेल, असा टोलाही तनवाणी यांनी मारला.